Multiple myeloma : मल्टिपल मायलोमा म्हणजे काय?; लक्षणे आणि उपचार | पुढारी

Multiple myeloma : मल्टिपल मायलोमा म्हणजे काय?; लक्षणे आणि उपचार

मल्टिपल मायलोमा (मायलोमा) (Multiple myeloma) म्हणजे एक प्रकारचा बोन मॅरो कॅन्सर. बोनमॅरो हे हाडांच्या पोकळीतील एक पेशीजल असते, त्यात रक्त निर्माण करणार्‍या पेशी असतात. मायलोमा (मल्टिपल मायलोमा) हा प्लाझ्मा पेशींशी संबंधित कर्करोग आहे. प्लाझ्मा पेशी पांढर्‍या रक्त पेशी आहेत, ज्या संसर्ग टाळण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्यास जबाबदार असतात. मायलोमामध्ये पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात आणि सामान्य पेशी अस्थिमज्जामध्ये वाढतात; ज्यामुळे लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि इतर पांढर्‍या रक्तपेशी तयार होण्यास मदत होते. या पेशी सामान्यपणे अस्थिमज्जामध्ये आढळतात आणि प्रतिरक्षा प्रणालीचा भाग असतात. मल्टिपल मायलोमामुळे अस्थिमज्जामध्ये प्लाझ्मा पेशींचा संचय होतो आणि रक्त पेशींच्या उत्पादनांवर त्याचा परिणाम होतो.

लक्षणे :

मायलोमा (Multiple myeloma) असलेल्या व्यक्तीला सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसू येत नाहीत. परंतु, नंतर लघवीतील प्रथिने सामान्य पातळीपेक्षा जास्त असणे, ताप, संसर्ग, जखम, रक्तस्त्राव, श्वास घेण्यास त्रास, हात आणि पायांमधील अशक्तपणा आणि थकवा यांसारखी लक्षणे आढळून येतात. अशी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका.

कारणे :

या कॅन्सरचे नेमके कारण माहीत नसले तरीही एखाद्याला वय झाल्यावर आणि लठ्ठपणा किंवा जास्त वजन असल्यास मायलोमा होऊ शकतो. या कॅन्सरबद्दल अजूनही जागरूकता कमी आहे. तसेच, या कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबातील कोणाला हा कॅन्सर असेल तर सावध राहावे. तसेच वाढते वय, कौटुंबिक इतिहास आणि अज्ञात महत्त्वाचा मोनोक्लोनल गॅमोपॅथीचा वैयक्तिक इतिहास असल्यास मायलोमाचा धोका वाढतो. योग्यवेळी मायलोमाचे निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे. असे केल्याने रोगावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येते.

निदान :

रक्त चाचण्या जसे की संपूर्ण रक्त गणना, क्रिएटिनिन, कॅल्शियम, मूत्र चाचण्या, पीईटी सीटी, एक्स-रे आणि बोन मॅरो या काही चाचण्या आहेत, ज्या तज्ज्ञांना कर्करोग शोधण्यास मदत करू शकतात. बोन मॅरो बायोप्सी अस्थिमज्जामध्ये सामान्य आणि असामान्य प्लाझ्मा पेशींची टक्केवारी जाणून घेण्यास मदत करते. तपासल्यानंतर तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न करा.

उपचार :

स्टिरॉईड्स, इम्युनोमोड्युलेटर्स आणि टार्गेटेड थेरपीसारख्या उपचारांचा समावेश आहे. कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी डॉक्टरांद्वारे औषधे आणि अँटीबायोटिक्स लिहून दिली जाऊ शकतात. कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी स्टिरॉईड्सदेखील सुचवले जाऊ शकतात. वेळीच निदान व उपचार केल्याने रोगाचे निदान करण्यात मदत होईल. या प्रकारच्या कॅन्सरने जगणे आव्हानात्मक ठरू शकते. संतुलित आहाराचे सेवन करणे, धूम—पान आणि मद्यपान सोडणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि तणाव आणि नैराश्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असल्यास समुपदेशनाची मदत घ्यावी.

-डॉ. सुहास आग्रे

Back to top button