पोटाचे आरोग्य बिघडलय? आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या | पुढारी

पोटाचे आरोग्य बिघडलय? आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या

कोलायटीस किंवा विशेषत: मोठ्या आतड्याला सूज आल्यास आणि त्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडलेले असल्यास आरोग्यवर्धिनी आणि त्रिफळा गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या रिकाम्या पोटी घ्याव्या. दोन्ही जेवणानंतर अभयारिष्ट चार चमचे आणि आम्लपित्त वटी तीन गोळ्या घ्याव्या. झोपताना एक चमचा त्रिफळाचूर्ण घ्यावे.

मलावरोध आणि खडा होत असल्यास गंधर्वहरितकी घ्यावे. आतड्याच्या सुजेबरोबर ग्रहणी म्हणजे मलप्रवृत्तीचे समाधान नसल्यास या दुर्धर विकाराकरिता रिकाम्या पोटी आरोग्यवर्धिनी तीन गोळ्या घ्यावे. झोपताना त्रिफळाचूर्ण घ्यावे. पोटफुगी हे जादा लक्षण असल्यास प्रवाळ पंचामृत सहा गोळ्या आणि पंचकोलासव आणि शंखवटी आणि पिप्पलादिकाढा गरजेप्रमाणे चार चार चमचे घ्यावा. जुनाट ग्रहणी, आतड्याची सूज आणि खूप वेळा मलप्रवृत्ती आणि लक्षणाकरिता भोजनोत्तर कुटजारिष्ट चार चमचे आणि कुटजवटी तीन किंवा सहा गोळ्या घ्याव्या.

आतड्यांना सूज आणि वारंवार पातळ जुलाब आणि ग्रहणी या तक्रारीकरिता संजीवनीवटी, शमनवटी आणि कुटजवटी प्रत्येकी सहा गोळ्या आणि पाचक चूर्ण अर्धा चमचा दोन्ही जेवणानंतर घ्यावे. पथ्थ्य : ही व्याधी असणार्‍या रुग्णांनी ताजे गरम आणि माफक प्रमाणात भोजन घ्यावे. आहारात पुदीना, आले, लसूण यांची चटणी, तांदूळ भाजून भात किंवा तांदळाची भाकरी, ताक, ज्वारीची भाकरी, पथ्यकर फळभाज्या, अननस, पपई, संत्रे, लिंबू यांचा समावेश असावा.

रसायन चिकित्सा : कुडासाल ताकातून उगाळून घेणे, बिब्ब्याचे शेवते, अमृतभल्लातक कल्प, संजीवनी.

योग आणि व्यायाम : कोलायटीसचा त्रास असणार्‍यांनी किमान बारा सूर्यनमस्कार दररोज घालावेत. तसेच पश्चिमोत्तानासन केल्यासही चांगला लाभ होतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी फिरून येणे.

रुग्णालयीन उपचारांमध्ये निरुह किंवा कृमीघ्य बस्ती, आवश्यक तेव्हा सौम्य विरेचन, पिच्छबस्ती हे उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत. या आजारासाठीचा चिकित्साकाल तीन महिने ते एक वर्ष इतका आहे.

निसर्गोपचार : काही काळ ताकावर राहणे, कोष्ठशुद्धीकरता गोमूत्र, लघू आणि अगोड आहार.

संकीर्ण : एक वेळेला जेवेल तो योगी, दोन वेळेला जेवेल तो भोगी आणि तीन वेळेला जेवेल तो रोगी हे जरा अतिशयोक्तीचे दिसणारे वचन सतत डोळ्यांसमोर हवे.

 

Back to top button