Health : व्यायाम करताना काय काळजी घ्यावी?

Health : व्यायाम करताना काय काळजी घ्यावी?
Published on
Updated on

Health : सध्या जिममध्ये जाणार्‍या लोकांची संख्या वाढली आहे आणि व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशावेळी काय करावे? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी? दररोज व्यायाम केल्याने एखाद्याच्या हृदयाच्या आरोग्यास चालना मिळते, हे जरी खरे असले तरी व्यायाम करताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. व्यायाम करतेवेळी हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण 45 वर्षांवरील पुरुषांमध्ये झपाट्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. बर्‍याचदा अतिव्यायामामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. व्यायाम करताना शरीर आखडणे, डावा खांदा दुखणे, घसा दुखणे, छातीत दुखणे, पाठदुखी यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जर अशी लक्षणे दिसत असतील तर तत्काळ व्यायाम थांबवावा.

मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम—पानाचा इतिहास, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांनी व्यायाम करताना अधिक काळजी घ्यावी. खूप जास्त प्रमाणात किंवा खूप वेगाने व्यायाम करणे टाळावे. हलगर्जीपणे व्यायाम केल्यामुळेसुद्धा आपल्या हृदयावर ताण येतो. त्यामुळे जास्त वजन असणे, कोणत्याही विश्रांतीशिवाय धावणे आणि जास्त वेळ आणि प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्याने किंवा करताना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.

Health : जेव्हा एखादी व्यक्ती सवय नसताना अचानक त्याची फिटनेस पातळी जाणून न घेताच व्यायामाला सुरुवात करते तेव्हा त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जर छातीत किंवा पाठीत जडपणा जाणवत असेल, मळमळ होत असेल, चक्कर येत असेल किंवा तुम्ही कोलमडून पडाल असे वाटत असेल तर लगेच व्यायाम करणे थांबवावे.

व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका एखाद्याच्या हृदयात असलेल्या ब्लॉकेजमुळेदेखील होतो. हृदयावर जास्त दाब पडल्याने प्लेक फुटतो किंवा हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतात आणि एखाद्याला अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जिममध्ये जाणार्‍यांनी कोणताही व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदयाच्या आरोग्याविषयी जाणून घेण्यासाठी कार्डियाक स्क्रीनिंग करून घ्यावे. आठवड्यातून किमान 5 दिवस 150 मिनिटे वेगवान चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे आणि योगा यांसारख्या व्यायामाची निवड करावी.

Health : 2-3 तास सलग व्यायाम करण्याऐवजी दररोज 45 मिनिटे व्यायाम करणे चांगले. जर शारीरिक वेदना होत असतील किंवा जास्त दम लागत असेल तसेच अशक्त वाटत असेल तर व्यायाम करू नका. हळूहळू व्यायामाला सुरुवात करावी. जर अस्वस्थ वाटत असेल तर जबरदस्तीने व्यायाम न करता त्या दिवशी व्यायाम करणे टाळावे. तुमच्या क्षमतेनुसार व्यायाम करावा, तसेच इतरांशी अजिबात तुलना करू नये.

  • डॉ. बीपीनचंद्र भामरे 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news