immunity : मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी

immunity : मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी
Published on
Updated on

हवामान बदलले की, लहान मुले हमखास आजारी पडतात. बदलत्या हवामानामुळे होणार्‍या संसर्गाचा प्रतिकार करण्याची ताकद (immunity) मुलांमध्ये नसते आणि मग सर्दी-तापासारखे आजार त्यांना जडतात. मुलांची प्रतिकारशक्ती (immunity) वाढवण्यासाठी काही उपाय आहेत. मुलांना व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित करा. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अधिक वजन असलेल्या बाळांना सडपातळ बाळांच्या तुलनेत संसर्ग अधिक होतो. व्यायामामुळे शरीरातील पांढर्‍या पेशींची संसर्गाशी मुकाबला करण्याची क्षमता वाढते. म्हणून तुमच्या मुलांना शारीरिक हालचाली करण्यास प्रोत्साहन द्या. इमारतीच्या परिसरात, मैदानावर त्यांना खेळायला पाठवा. त्यांच्यासाठी खेळासारखा दुसरा व्यायाम नाही.(immunity )

पोषक आहार द्या

मुलांना पौष्टिक आहार द्या. योग्य प्रमाणात फळे आणि भाज्यांचा समावेश त्यांच्या आहारात असणे गरजेच आहे. 'क' जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सीडंट्स असणारे पदार्थ त्यांना खायला द्या. यात नैसर्गिक पोषक घटक असतात आणि त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. स्ट्रॉबेरीसारखी हंगामी फळे त्यांना खायला द्या. पेरू, पपई, जांभळे, टोमॅटो, रताळी अशा
फळे, फळभाज्यांचा समावेश त्यांच्या आहारात करा.

साखरेचे प्रमाण कमी करा

मुलांच्या आहारात साखरेचे प्रमाण अतिरिक्त असता कामा नये. भरपूर साखर असलेली शीतपेये वगैरे त्यांना सारखी देऊ नका. साखर अतिरिक्त प्रमाणात खाण्याने प्रतिकार शक्ती कमी होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एक चमचा साखर आपली प्रतिकार शक्ती चार तासांनी घटवते. त्यामुळे तुमच्या मुलांच्या साखर खाण्यावर नियंत्रण ठेवा.

नियमित झोपेची सवय लावा

मुलांना नियमित वेळेत झोपण्याची सवय लावा. अपुर्‍या झोपेमुळे प्रौढांनाही आजारी पडायची वेळ येते, तेव्हा लहान मुलांना त्याचा किती त्रास होईल याचा विचार करा. झोप कमी झाल्याने मुलांची चिडचिड होते. त्रासलेल्या मन:स्थितीत मुले आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. म्हणूनच मुलांना रात्री लवकर झोपण्याची सवय लावा.
मुलांना शांत झोप लागते की नाही, याकडे लक्ष द्या. तीन ते चार वर्षांच्या मुलांना किमान नऊ तास झोप आवश्यक असते.

मुलांना आरोग्यदायी सवयी लावा

मुले घरात असताना किंवा बाहेरून खेळून आल्यावर त्यांना आरोग्यदायी सवयी लागतील याची काळजी घ्या. जेवण्यापूर्वी आणि जेवल्यानंतर, तसेच शाळेतून किंवा बाहेर खेळून आल्यावर मुलांनी हातपाय स्वच्छ धुवायला हवेत. तशी सवय मुलांना लावा.

  • डॉ. संतोष काळे 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news