रजोनिवृत्तीनंतर होणार्‍या समस्या टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी | पुढारी

रजोनिवृत्तीनंतर होणार्‍या समस्या टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी

हाडांची ठिसुळता वाढणे आणि त्याचे दुष्परिणाम टाळावयाचे असल्यास वयाच्या पस्तीशीपासूनच काळजी घ्यावयास हवी. योग्य प्रमाणात कॅल्शियम घेणे, तसेच दूध व दुधाचे पदार्थ, सोयाबीन, खसखस, तीळ, जरदाळू, बदाम, पालक, मासे, कोबी, कडिपत्ता, अंडी, सीताफळ या पदार्थांतून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळू शकते.

रजोनिवृत्तीमुळे होणारे अनेक दूरगामी परिणाम मुख्यत: हाडे, हृदय मेंदू व मज्जासंस्था यावर दिसून येतात; पण हाडांवर होणारा परिणाम म्हणजे हाडांची ठिसूळता, शरीरातील हाडांच्या आत कोलॅजेन या पदार्थांमुळे अस्थिमज्जेमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मँगेनिज, बोरॉन, सिलिकॉन आदी खनिजे ठासून भरलेली असतात. या सर्वांमुळे हाडे मजबूत राहतात व त्यांना ताकद मिळते; पण जेव्हा या कोलॅजेनमध्ये पोकळी निर्माण होते, तेव्हा पर्यायाने हाड पोकळ बनते व त्याची घनता कमी होऊन ते नाजूक बनते. यालाच हाडांची ठिसुळता म्हणतात. विशेष म्हणजे हा विकार कोणतीही पूर्वसूचना न देता शरीरात पसरतो. कधी कधी अगदी क्षुल्लक कारणाने किंवा विनाकारणसुद्धा हाड मोडून फ्रॅक्चर होते; पण जर योग्य काळजी घेतली तर मात्र हा आजार टाळता येऊ शकतो.

आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते. किंबहुना ते तसे असावे लागते. इस्ट्रोजन नावाच्या हार्मोन्सचे प्रमाण कमी झाल्यास रजोनिवृत्तीनंतर हाडे पोकळ होऊ लागतात. हाडांची घनता पस्तीशीमध्ये सर्वात जास्त असते. त्यानंतर स्त्रिया व पुरुष दोघांतही ही घनता कमी होते. स्त्रियांमध्ये हे प्रमाण रजोनिवृत्तीनंतर वाढते. बहुतेक वेळेला हात, पाय, कंबर दुखणे अशा तक्रारी सुरुवातीला उद्भवू लागतात. जर विकार वाढलाच तर पाठीला पोक येणे, उंची कमी होणे या गोष्टी जाणवतात. निदान लवकर होण्यासाठी हाडांची घनता मोजतात. सिटी किंवा डेक्सा बोन डेन्सिटोमेट्रीचा यासाठी उपयोग करतात.

हाडांची ठिसुळता वाढणे आणि त्याचे दुष्परिणाम टाळावयाचे असल्यास वयाच्या पस्तीशीपासूनच काळजी घ्यावयास हवी. योग्य प्रमाणात कॅल्शियम घेणे, तसेच दूध व दुधाचे पदार्थ, सोयाबीन, खसखस, तीळ, जरदाळू, बदाम, पालक, मासे, कोबी, कडिपत्ता, अंडी, सीताफळ या पदार्थांतून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळू शकते. आहार आणि विहाराचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. चालणे, पळणे, सायकल चालवणे, सूर्यनमस्कार, जॉगिंग, योगासने, पोहणे हे व्यायाम आपल्या जीवनशैलीप्रमाणे करावेत.

  • डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button