धूम्रपानामुळे गर्भधारणा, वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते, जाणून घ्या याचे होणारे परिणाम | पुढारी

धूम्रपानामुळे गर्भधारणा, वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते, जाणून घ्या याचे होणारे परिणाम

जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ) नुसार धूम्रपान हे जागतिकद़ृष्ट्या मृत्यूचं टाळता येण्याजोगं कारण आहे. तर धूम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक आहे. सिगारेट व सिगारेटच्या धुरामध्ये 4,700 हून अधिक घातक रासायनिक संयुगे असतात, जी सर्वाधिक विषारी असतात. गर्भधारणेचे नियोजन करणार्‍या अनेक कुटुंबांसाठी धूम्रपानाचा परिणाम हा एक चिंतेचा विषय ठरत आहे.

गरोदरपणात धूम्रपान करणे केवळ न जन्मलेल्या बाळासाठीच नव्हे तर आईसाठीही हानिकारक आहे. स्त्रीने गर्भधारणेपूर्वी धूम्रपान सोडले पाहिजे. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान केल्याने वाढ मंद होण्याचा आणि मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढतो, ज्यामुळे न जन्मलेल्या बाळाला क्रॅनिओफेसियल विकृती, म्हणजेच चेहरा, तोंड आणि ओठांच्या जन्मजात दोषांचा धोका असतो. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये आढळणारे निकोटीन न जन्मलेल्या बाळाच्या मेंदूला आणि फुफ्फुसांनाही नुकसान पोहोचवू शकते. धूम्रपानामुळे स्त्रीला गर्भधारणा, प्रजनन किंवा वंध्यत्व यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पुरुष व गर्भवती महिला या दोघांनीही वर्ज्य करणे आवश्यक आहे.

1. जर एखादी स्त्री गर्भधारणेदरम्यान धूम्रपान करत असेल तर त्यांना गर्भपात होण्याचा धोका, जन्मजात विकृती, बाळाच्या विकासात अडथळा येणे, अकाली प्रसूती तसेच स्टील बर्थ, जन्मतः बाळाचे वजन कमी भरणे आदी समस्यांचा सामना करावा लागतो.
2. वारंवार धूम्रपान करण्यानं बौद्धिक स्तरावर (आयक्यू) देखील परिणाम होतो. मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण वाढतं, हिमोग्लोबीनवरदेखील परिणाम होतो.
3. धूम्रपानमुळे प्रजनन क्षमतासुद्धा कमी होते आणि त्यामुळे जोडप्यांना गर्भधारणा करणे कठीण होते. स्त्रियांना धूम्रपानमुळे गर्भधारणावेळी धोका यासह फॅलोपियन ट्यूबमध्ये समस्या उद्भवू शकतात.
4. विकसनशील गर्भासाठी, धूम्रपानच्या संपर्कात येण्यामुळे शारीरिक आणि मानसिक अपंगत्व येऊ शकते.
5. बाळाची जन्मापूर्वी वाढ मंदावते. गरोदरपणात धूम्रपान करणार्‍या मातांच्या बाळांना आणि जन्मानंतर सिगारेटच्या धुराच्या संपर्कात आलेल्या बाळांना-एसआयडीएसचा धोका जास्त असतो. योग्य वेळेत धूम्रपान करणे थांबविल्यास बाळाला जास्त ऑक्सिजन मिळतो.
6. धूम्रपानच्या परिणामांमुळे एक्टोपिक गर्भधारणा होऊ शकते. निकोटीनमुळे फॅलोपियन ट्यूब आकुंचन पावते, फलित अंडी गर्भाशयापर्यंत पोहोचण्यापासून रोखते, परिणामी एक्टोपिक गर्भधारणा होते.

धूम्रपान सोडणे अवघड आहे, पण अशक्य नाही. ज्या महिलांना आई व्हायचे आहे त्यांनी स्वत:चे आणि न जन्मलेल्या मुलाचे आरोग्य लक्षात घेऊन लवकरात लवकर धूम्रपानपासून दूर राहावे. अगदी पॅसिव्ह स्मोकिंगचा देखील गरोदर महिलांवर धूम्रपानकरण्यासारखाच परिणाम होतो, त्यामुळे सेकंडहँड स्मोकिंग देखील टाळणे महत्त्वाचे आहे.

डॉ. प्रतिमा थमके,
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ

Back to top button