Muscle pain : उसण भरल्यास ‘हे’ करा उपाय, जाणून घ्या अधिक | पुढारी

Muscle pain : उसण भरल्यास 'हे' करा उपाय, जाणून घ्या अधिक

उसण भरणे ही खरे तर व्याधी नाही, पण अनेकांना या विकाराचा त्रास होतो. (Muscle pain) तथापि, वेळेत काळजी घेऊन योग्य उपचार केले तर एक दोन दिवसांत हा विकार लगेचच बरा होतो.

या विकारात प्रथम संबंधित अवयवाची प्रत्यक्ष स्पर्शाने, हाताने दाबून व्याप्ती बघावी. खूप महत्त्वाची हाडे सोडून हा विकार फक्त पाठीच्या स्नायूंपुरता मर्यादित असला तर हलक्या हाताने कोणतेही तेल थोडा वेळ जिरवले तर लगेच आराम पडतो. पोटात घ्यावयाच्या औषधांची गरज पडत नाही.

अपचन, अजीर्ण, पोटात गॅस धरणे असा पूर्वेतिहास असल्यास सुंठयुक्त गरम पाणी, कणभर मिठाबरोबर ओवाचूर्ण, आलेेलिंबाचा रस, हिंगाष्टकचूर्ण अशांमधून किमान औषधांची निवड करावी. पाठीला, उसण भरलेल्या भागाला हलक्या हाताने महानारायण तेल, शतावरीसिद्ध तेल, चंदनलालाक्षदि तेल, तीळतेल, सहचर तेल अशांपैकी कोणत्याही तेलाने अभ्यंग करावे.

Muscle pain : गुग्गुळकल्प निश्चितपणे उपयोगी पडतात

हा त्रास वारंवार उद्भवत असल्यास आणि संबंधित रुग्ण स्थूल असल्यास गुग्गुळकल्प निश्चितपणे उपयोगी पडतात. सुरुवातीच्या काळात लाक्षदि, गोक्षुरादि, सिंहनाद, त्रिफळा गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या दोनवेळा सकाळ सायंकाळ; आठवडा दोन आठवडे घेऊन पाहावे. झोपताना आणि सकाळी अंघोळीच्या अगोदरवर सांगितल्याप्रमाणे संबंधित अवयवाला योग्य ते तेल जिरवावे. जेवणानंतर सौभाग्यसुंठ अर्धा चमचा ज्यांना भरपूर शारीरिक श्रम आहेत; दीर्घकाळची बैठीकामे आहेत आणि चटकन आराम हवा आहे, त्यांनी संधिवातारी, आभादि, गणेशगुग्गुळ अशा जादा औषधांची मदत घ्यावी.

उसण भरणे या लक्षणाबरोबर पांडुता हे लक्षण असल्यास चंद्रप्रभावटी प्र. 3 गोळ्या दोन वेळा जादा औषध म्हणून घ्यावे. वर सांगितलेल्या तेलाच्या अभ्यंगाचा विशेष उपयोग होत नसल्यास एक भाग गवती चहा अर्क तेल चार भाग घेऊन संबंधित अवयवाला जिरवावे. उसण भरणे विकारात संबंधित अवयव अस्थिचा असल्यास दोषघ्य लेपगोळीचा दाट आणि गरम लेप दुपारच्या वेळात स्वस्थपणे लावावा.

विशेष दक्षता आणि विहार : आपणास जमेल अणि झेपेल असा सावकाश चालवण्याचा व्यायाम अवश्य करावा. घाईगर्दीने कारण नसताना खूप शारीरिक श्रम करून रोगाचे स्वरूप वाढवू नये. विश्रांती घेऊन थोडा आराम करून, कठीण आणि उबदार अंथरुणावर उताणे झोपून आराम पडतो का हे अवश्य पहावे.

पथ्य : पोटात वायू धरणार नाही, पोट आकारण डब्ब होणार नाही, ढेकरा, अपचन, अजीर्ण यांचा त्रास होणार नाही असा माफक, हलका आहार असावा. जेवणात पुदिना-आले अशी चटणी, दुधी भोपळा, पडवळ, घोसाळे, राजगिरा, ज्वारी, तांदूळ भाजून भात असा आहार असावा.

कुपथ्य : आपल्या पचनाच्या ताकदीच्या बाहेर अजिबात जेवू नये. सर्व तर्‍हेची पक्वान्ने, जडान्न, शिळे अन्न, मेवामिठाई, मांसाहार बेकरी पदार्थ, थंडपदार्थ टाळावेत.

योग आणि व्यायाम : पोटात वायू साठणार नाही; पक्वाशयातील वायू मोकळा होईल इतपत माफक मोकळी हालचाल असावी. योगासनांचा अतिरेक नको.

रुग्णालयीन उपचार : आवश्यकतेनुसार 25 मिली तेलाची पिचकारी किंवा मात्रा बस्ति. गरज पडल्यास दशमूलादि वनस्पतींचा निरुबस्ति (एनिमा) दोषघ्न लेपगोळीचा दाट आणि गरम लेप, टाकणखार आणि गव्हाची कणीक यांचे पोटीस, गवती चहा युक्त तेलाचा अभ्यंग यांचाही यावर चांगला लाभ होतो.

या उपचारांसाठीचा चिकित्सा काल एक, दोन दिवस ते दोन आठवडे इतका आहे. या काळात सावकाश आणि थकवा येणार नाही इतपत चालण्याचा व्यायाम करणे, शक्यतो पोक न काढता काही काळ ताठ बसणे, कठीण आणि उबदार अंथरुण वापरणे आवश्यक आहे.
संकीर्ण : उसण भरणे या विकारात प्राथमिक अवस्थेतच किमान उपचार केले, फाजील श्रम किंवा अकारण ओझे उचलणे, जागरण आणि उशीरा झोप अशा अनिष्ट गोष्टी टाळल्या तर खूप ओषधे दीर्घकाळ घ्यावी लागत नाहीत. ‘काट्याने नायटा होतो’ हे मी सुजाण वाचकांना सांगावयास हवे का? शुभं भवतु!

  • वैद्य विनायक खडीवाले

Back to top button