डोळे निरोगी राहण्यासाठी ‘हे’ करा व्यायाम | पुढारी

डोळे निरोगी राहण्यासाठी 'हे' करा व्यायाम

डोळे हे एकूणच मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. वास्तविक, डोळ्यांची ठेवणच अशी असते की, त्यांचे निसर्गत:च रक्षण होत असते. डोळे खोबणीत अगदी सुरक्षित असतात. भुवया, पापण्या, डोळ्यांचे धूळ आणि उन्हापासून रक्षण करण्यास सज्ज असतात. डोळ्यांचे रोगापासून द़ृष्टिदोषांपासून रक्षण मात्र माणसालाच करावे लागते.

डोळे निरोगी राहावेत, यासाठी बालपणापासून पोषक आहार मिळणे आवश्यक असते. ‘अ’ जीवनसत्त्व आणि प्रोटिन्सची आवश्यकता असते. हिरव्या पालेभाज्या विशेषत: पालक, कढीलिंब, तसेच चवळी, मूग यासारखी कडधान्ये पपई, आंबा यासारखी फळे यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. दूध, अंडी, मांस, मासे यांच्या आहारमुळेही ‘अ’ जीवनसत्त्व मिळते. आवश्यक असलेल्या आहाराच्या अभावामुळे डोळ्यांचा टवटवीतपणा सतेजपणा कमी होत जातो. म्हणूनच बालपणापासून असा आहार मिळाला नाही तर पुढे डोळ्यांच्या गंभीर तक्रारी सुरू होतात आणि त्यातून अंधत्वही येऊ शकते.

गरोदर स्त्रियांमध्ये अंधूक, मंद प्रकाशात कमी दिसण्याचे प्रमाण बरेच असते. याचे कारणही हेच आहे. तिच्यासाठी आणि तिच्या गर्भाच्या पोषणासाठी तिला जीवनसत्त्वयुक्त आहाराची जास्त प्रमाणात गरज भासत असते आणि अशा आहाराच्या अभावामुळे तिच्या द़ृष्टीवर परिणाम होत जातो. अंगावर पाजणार्‍या मातेला ‘अ’ जीवनसत्त्व आणि प्रोटिन्स यांची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. ती तिला मिळाली पाहिजे. नाहीतर त्याच्याअभावी आई आणि बाळ या दोघांच्याही द़ृष्टीवर परिणाम होईल. अंगावरच्या दुधासारखे कोणतेही दूध बालकांना पूर्णान्न होऊ शकत नाही. बाळंतपणाच्या पहिल्या दिवशी जे दूध येते ते काहीसे पिवळे आणि चिकट असते. हे दूध ‘अ’ जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असते.

आपल्या देशात डोळे येणे, चिकटणेसारखे संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणावर आढळतात. याचे प्रमाण खेड्यात राहणार्‍या लोकांत आणखीनच जास्त असते. रोगाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात येणार्‍या अनेकांना या संसर्गजन्य रोगाच्या जंतूपासून रोग होऊ शकतो. रोग्याने वापरलेले काजळ, सुरमा लावायची सळई, टॉवेल इत्यादी वस्तू कोणीही वापरल्यास त्यांनाही हे आजार होऊ शकतात. विशेषत: शेतात काम करणार्‍या स्त्रिया आपल्या मुलांचे तोंड, डोळे पुसताना नेहमीच आपल्या पदराचा वापर करतात. यामुळे पदराची घाण, जंतू मुलाच्या डोळ्यात जातात.

डोळ्यांसाठी व्यायाम

डोळे वर, खाली, डावीकडे, उजवीकडे फिरवणे, सकाळच्या वेळी गार्डनमधील गवतावर फिरायला जाणे. गवतावर अनवाणी फिरण्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. निसर्गाने बर्‍याच गोष्टी मानवाला बहाल केल्या आहेत. त्यातील गवतावरील दवबिंदू ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी मोठी देणगी आहे. फक्त आपण या बहुमूल्य देणगीचा उपयोग किती करून घेतो, यावरच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहणे अवलंबून आहे.

  • डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button