‘या’ कारणांनी लघवीचा रंग बदलतो, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

‘या’ कारणांनी लघवीचा रंग बदलतो, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

अतिसार, काविळ, मधुमेह, मूतखडा, मूत्रपिंडविकार, मलेरिया, थंडीताप यासारख्या आजारावर औषध देताना रक्त आणि लघवीची तपासणी केली जाते. आजारी माणसाला साधारणपणे लघवी करताना जळजळ होणे, प्रमाण कमी होणे, रात्रभर लघवी होणे किंवा भरपूर लघवी होणे यासारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच शरीरातील अतिरिक्त पाणी हे घामावाटे निघून गेल्याने बर्‍याच जणांना योग्य प्रमाणात लघवी होत नाही. त्यामुळे आजारी व्यक्तीने अगोदर लघवीच्या प्रमाणाकडे आणि रंगाकडे लक्ष देणे गरजेचे असते.

लघवी करताना कोणताही त्रास किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेण्यास सुरुवात करायला हवी. विशेष म्हणजे पाणी कमी पिल्याने लघवीचे आजार सुरू होतात. त्यामुळे पाणी पिण्याचा कंटाळा करू नये आणि पाणी भरपूर प्यावे, जेणेकरून शरीरातील तापमान सामान्य राहून आजारांना अटकाव करण्यास मदत होईल. लघवीत संसंर्ग झाल्यास अंगात ताप येतो आणि आजारी व्यक्तीला थंडी वाजून येते. हा संसर्ग अनेक कारणांमुळे होऊ शकतो. त्यासाठी लघवी तपासूनच त्यावर उपचार करावे लागतात.

लघवीचा रंग आणि पाण्याचे प्रमाण : लघवीचा पिवळा रंग हा शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि समतोलपणा दर्शवितो. लघवीचा रंग पाहून समजते की पाणी किती घ्यावे आणि किती नको. जर लघवीचा रंग अधिक गडद पिवळा असेल तर अधिक पाणी पिण्याची गरज आहे, असे समजावे. शरीरातील पाणी कमी झाल्यास थकवा जाणवतो. याउलट शरीरात पुरेसे पाणी असेल तर कामात उत्साह जाणवतो. घामावाटे किंवा लघवीवाटे अधिक पाणी गेल्यास अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे लघवीकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते.

पांढरी लघवी : ढगाळ रंगाची किंवा पांढरी लघवी येत असल्यास विशेषत: महिलांसाठी हे आजारपणाचे लक्षण ठरू शकते. अतिसारामुळे फेसयुक्त लघवी होते. मूत्राशयातील संसर्गामुळे लघवीचा रंग बदलतो. मूत्राशयाचा आजार, मूतखडा यामुळे रंग बदलतो. पांढरी लघवी हे सुद्धा संसर्गाचे लक्षण मानले जाते. तसेच लघवीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण वाढले असले तरी रंग बदलतो. प्रोटीनचे अतिप्रमाण झाल्याने मूत्रपिंडाचे विकार उद्भवतात. अशावेळी डॉक्टर लघवीची तपासणी करून पुढील उपचार निश्चित करत असतात.

लघवीला विचित्र रंग येणे

नारिंगी रंग : मूत्राशयातील विकारामुळे जर अँन्टिबायोटिक गोळ्या किंवा औषध घेतले तर लघवीला नारिंगी रंग येतो. तसेच 'क' जीवनसत्त्व आणि अतिप्रमाणात गाजर खाल्ल्यामुळे देखील लघवीचा रंग बदलतो.

लाल रंग : जर लघवीत रक्त उतरले तर त्याचा रंग लाल होतो. अशी लघवी येत असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. अनेकांना शरीरातील उष्णता कमालीची वाढल्यामुळे लाल रंगाची वा रक्तमिश्रित लघवी होते. काही वेळा मूत्राशयमार्गावर जखम झाल्यास किंवा संसर्ग झाल्यास लघवी लालसर बनते.

जांभळा रंग : प्रोफायरिन्सच्या चयापचयात बिघाड झाल्यास लघवीतून प्रोफायरिन जाते. त्यामुळे लघवीचा रंग जांभळट होतो.

हिरवा किंवा तपकिरी : संसर्गावरील उपचारासाठी औषध किंवा वेदनाशामक गोळ्या घेतल्या तर लघवीचा रंग बदलतो आणि तो हिरवा किंवा तपकिरी होतो. याबाबत डॉक्टरांना माहिती देऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधी घ्यावीत.

लघवीचा वास येणे : हादेखील आजारांसंदर्भातील तसेच शरीरातील बदलांसंदर्भातील सूचना देत असतो.

हिरव्या भाज्यांचे अतिसेवन केल्याने लघवीचा वास बदलतो.

लघवीत संसर्ग झालेला असेल तर वासाची तीव्रता वाढते.

लघवीतून गोड वास येत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण मानले जाते.

बरेचदा अँटीबायोटिक्स घेतल्यामुळेही लघवीचा रंग आणि वास यावर परिणाम होतो.

  • डॉ. संतोष काळे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news