मुले टूथपेस्ट खात असल्यास… | पुढारी

मुले टूथपेस्ट खात असल्यास...

आपले पाल्य वेळोवेळी टूथपेस्ट खात असेल तर या सवयींमुळे दात आणि हिरड्याचा आजार बळावण्याचा धोका राहू शकतो. आपण लहान मुलांना टूथपेस्ट खाताना किंवा चाखताना पाहिले असेल; परंतु टूथपेस्ट पोटात गेल्यास स्केलटेल फ्लोरोसिससारखा गंभीर आजार होऊ शकतो. त्याच्या नियमित सेवनाने हाडे कमकुवत होऊ लागतात आणि दातही खराब होण्यास सुरुवात करतात.

वास्तविक हा आजार वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात फ्लोराईडयुक्त पाणी प्यायल्याने होतो; परंतु अनेक बाबतीत टूथपेस्ट देखील कारणीभूत राहू शकते. यासंदर्भातील संशोधनातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांंच्या शरीरात थेट फ्लोराईडचा अंश जाणे धोक्याचे असते. त्यामुळे दातांची स्वच्छता करण्यासाठी वाटाण्याएवढीच पेस्ट घेणे पुरेसे आहे. फ्लोरोसिस आजाराचे दोन प्रकार आहेत. यात पहिले डेंटल फ्लोरोसिस. हा आजार प्रामुख्याने लहान मुलांना होतो. यात सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे दात पिवळे पडू लागतात. दुसरे म्हणजे स्केलेटल फ्लोरोसिस. यामध्ये शरीराच्या सांधेजोडावर परिणाम होतो. यात मान, पाठ, खांदा, गुडघा हे अशक्त होऊ लागतात आणि हे दुखणे बळावते.

फ्लोरोसिसचे लक्षणे : दात गरजेपेक्षा अधिक पिवळसर पडणे, हात आणि पाय यांना सतत मागेपुढे करणे. पाय हे आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूने वाकणे, गुडघेदुखी, वाकताना किंवा बसताना त्रास होणे, खांदा, हात आणि पायातील जोड दुखणे.

लक्षात ठेवा : लहान मुलांसाठी कमी फ्लोराईडयुक्त टूथपेस्टचा वापर करावा. तोंड धुताना मुलांसमवेत थांबा. त्यांना पेस्ट खाऊ देऊ नका. टूथपेस्ट मुलांच्या हाती लागणार नाही, अशा ठिकाणी ठेवा. मुले गरजेपेक्षा अधिक पेस्टचे सेवन करत असल्यास तत्काळ डॉक्टरकडे न्यावे.

डॉ. निखिल देशमुख

Back to top button