लक्षणे द़ृष्टी क्षीणतेची | पुढारी

लक्षणे द़ृष्टी क्षीणतेची

नजर कमजोर असणे ही नक्कीच चितेंची बाब आहे. डोळ्यांवर येणारा ताण, खराब किंवा धुरकट नजर यामुळे डोळे आणखी कमजोर होतात. त्यामुळे लिहिणे, वाचणे दुरापास्त होते. अनेकदा नजर कमजोर झाल्याचे संकेत मिळतात; पण त्याकडे लोक लक्ष देत नाहीत. नजर कमजोर झाली असेल, तर त्याकडे दुर्लक्ष मुळीच करू नये. कारण, त्यामुळे डोळ्यांचे कायमचे नुकसानही होऊ शकते.

डोळ्यांची क्षमता जाणून घेण्यासाठी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. द़ृष्टी कमजोर झाली असेल, तर चष्म्याचा नियमित वापर केला पाहिजे किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरल्या पाहिजेत. वास्तविक, याचे काही संकेतही आपल्याला मिळतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये. द़ृष्टी खराब होण्याची अनेक कारणे असतात. त्यात अनुवंशिक कारणेही असतात. काही जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास, डोळ्यांवर खूप ताण येत असेल, अंधारात वाचन किंवा अभ्यास करण्याची सवय असल्यास याचा डोळ्यांवर प्रतिकूल परिणाम होतो.

लक्षणे कोणती?

* जवळच्या आणि दूरच्या वस्तू दिसणे, वाचणे कठीण जाते.
* रात्री अंधुक दिसणे
* डोळ्यांच्या वेदना
* खूप जास्त प्रकाश असेल, तर इंद्रधनुष्यासारखे दिसणे
* प्रतिमा दुहेरी दिसणे
* डोळे सुजणे, लाल होणे
* डोळ्यांतून सतत पाणी येणे
* अंधारातून उजेडाकडे पाहणे कठीण होते

ही काही लक्षणे आपल्याला संकेत देत असतात की, डोळ्यांची क्षमता कमी होत आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो चष्मा किंवा लेन्सेस वापराव्यात.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ः कमजोर नजर असेल तर काही सामान्य लक्षणे कोणती ते आपण पाहिले. डोळ्यांची नियमित तपासणी करावी. तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच तपासणी करून घ्यावी. चष्मा असल्यास त्याचा नियमित, रोज वापर केला पाहिजे. नजर चांगली राहावी म्हणून डोळ्यांचे काही व्यायाम जरूर करावे. त्याशिवाय द़ृष्टी चांगली राहावी म्हणून योग्य आहार आणि पौष्टीक आहार घेतला पाहिजे. त्याशिवाय नियमित व्यायाम आणि योगअभ्यासही जरूर केला पाहिजे. डोळे चांगले राहण्यासाठी दव पडलेल्या हिरवळीवर अनवाणी पायाने चालावे.

डोळा अत्यंत नाजूक अवयव आहे; पण तो आपल्याला जग दाखवत असतो. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. त्यासाठी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करावी आणि असल्यास चष्मा नियमित लावावा. डोळ्यांच्या व्यायामाने डोळे दीर्घकाळ निरोगी राहण्यासही मदत होते. डोळ्यांची नजर कमी होत असल्याचे अनेक संकेत आपल्याला मिळतात; पण त्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, नजर आणखीन खराब होते. डोळ्यांची तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे.

  • डॉ. महेश बरामदे

Back to top button