Parkinson's disease: सावधान! पार्किन्सन विस्तारतोय... | पुढारी

Parkinson's disease: सावधान! पार्किन्सन विस्तारतोय...

तरुण आणि मुले यांच्यामध्येही हल्ली पार्किन्सनचा धोका दिसून आला आहे. त्याचे कारण खूप जास्त तणाव, धूम्रपान आणि मद्यपान यांची व्यसने. मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये या आजाराची लक्षणे कोणती आहेत, यावरून या आजारापासून बचाव करता येईल.

तरुणांमधील पार्किन्सनची लक्षणे 

पार्किन्सनचा आजार हा मध्यवर्ती चेतासंस्थेशी निगडीत आहे. त्यामध्ये मेंदूमध्ये पेशींची निर्मिती होणे बंद होते. त्यात हात, दंड, पाय, तोंड आणि चेहरा यांना कंपवात होतो. कोणाही व्यक्‍तीशी हात मिळवताना हात कापणे, झोप कमी होणे, दम लागणे, थांबून थांबून लघवी होणे, सांधे कडक होतात, शारीरिक संतुलन बिघडते. त्यामुळे व्यक्‍ती चालताना, उभी असताना, बसताना पडते. सुरुवातीला कंपवात कमी प्रमाणात असतो म्हणजे त्याची लक्षणे कमी असतात. त्यामुळे अनेकदा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. सुरुवातीच्या काळात रुग्णाला चालणे, बोलणे आणि लहान लहान काम करताना अडचणी निर्माण होतात.

व्यसने, तणाव आणि जीवनशैली

खूप जास्त तणावाखाली राहिल्याने व्यक्‍तीला कमी वयातही पार्किन्सनसारख्या आजाराला तोंड द्यावे लागते. तंबाखू आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करणे हेदेखील या आजाराचे एक कारण आहे. कोणत्याही आजाराचे कारण जास्त औषधांचे सेवन आणि जंक फूडचे अतिसेवन यामुळेही हा आजार होऊ शकतो. या आजारामध्ये मेंदूतून जाणार्‍या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

पुरुषांमध्ये जास्त धोका

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये पार्किन्सन आजाराचे रुग्ण अधिक आढळून येतात. महिलांच्या तुलनेत पुरुष या आजाराने ग्रस्त होण्याची शंका 1.5 पट अधिक आहे. काही अभ्यासांतून असे निर्दशनास आले आहे की, महिलांमध्ये हा आजार कमी असण्याचे कारण महिलांमध्ये अ‍ॅस्ट्रोजेन हार्मोन्स स्रवित होतात. या कारणामुळे महिलांमध्ये पार्किन्सन आजाराचा धोका कमी असतो.

निदान अवघड : पार्किन्सन हा आजार गंभीर स्वरूपाचा आहे. त्याचे निदान करण्यासाठी ठोस अशी कोणतीही शारीरिक तपासणी किंवा उपचार नाहीत. केवळ लक्षणांच्या आधारे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यक्‍तीच्या हालचाली पाहून त्याचे निदान करता येते.

Back to top button