प्रसूतीनंतरची काळजी | पुढारी

प्रसूतीनंतरची काळजी

गर्भवती महिलांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतर आपली खास काळजी घेतली पाहिजे. प्रसूतीनंतर 40 दिवसांपर्यंत स्त्रीचे स्नायू अशक्त राहातात त्यामुळे सव्वा महिना प्रसूतीनंतर स्त्रियांनी खास काळजी घेतली पाहिजे. कारण आईची प्रकृती चांगली नसेल तर त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो.

प्रसूतीनंतर स्त्रीने स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आहार ः प्रसूतीनंतर सूप आणि हिरव्या पालेभाज्यांचे नियमित सेवन केले पाहिजे. मांसाहार करत असाल तर चिकन सूप, पाया सूप यांचे सेवन केले पाहिजे.

मसाज ः प्रसूतीनंतर मसाज करून घेणे हितकारक असते. कारण गर्भारपणाच्या काळात स्नायूंचा आकार वाढतो. प्रसूतीनंतर स्नायू कमजोर झालेले असतात, त्यामुळे प्रसूतीनंतर मसाज घेणे आवश्यक असते. त्यामुळे बाळ आणि बाळंतीण दोघांनाही मालिश करणे किंवा चोळणे आवश्यक असते.

संबंधित बातम्या

चांगली झोप ः प्रसूतीनंतर बाळाच्या वेळांनुसार आईला जागावे लागते, दूध पाजावे लागते, त्यामुळे आईला पुरेशी झोप मिळतेच असे नाही. त्यामुळे प्रसूतीनंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आराम करावा, झोप काढावी. बाळाच्या दिनक्रमानुसार बाळंतिणीने आपला दिनक्रम ठेवण्याचा प्रयत्न करावा.

सिझेरियननंतर टाक्यांची काळजी ः सिझेरियन झाल्यानंतर टाके पडतात, त्यांची योग्य देखभाल न केल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यासाठीच स्त्रीने सिझेरियन झाल्यानंतर टाक्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्याशिवाय सिझेरियन झाल्यानंतर अतिथंड पदार्थ खाऊ नयेत.

मूत्रसंसर्ग ः प्रसूतीनंतर सतत लघवी होत असेल, तर ती मासिक पाळीची समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करून नका. कदाचित तो मूत्रसंसर्ग असू शकतो. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घ्या.

स्नायूंचा व्यायाम ः बाळाच्या जन्मानंतर आईचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. स्वतःचे आरोग्य जपणे हेदेखील स्त्रीसाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे थोडा व्यायामही जरूर करू शकता. व्यायामामुळे थकवा दूर होतो आणि स्वतःला ताजेतवाने राखण्यासाठी ध्यानधारणा करता येते.

डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button