मनमोकळे हास्य हे उत्तम औषध आहे, असे म्हटले जाते. अनेक त्रासांवर हास्य हेच एक औषध असते. हसल्यामुळे फक्त आरोग्यच नाही, तर चेहर्यासाठीही उत्तम असते. हास्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू, डोळे, जबडा आणि हृदयाच्या पेशी यांना आराम मिळतो. पण धकाधकीच्या आयुष्यात तणावापोटी मनमोकळे हास्य विसरूनच गेलो आहोत. मनमोकळ्या हास्याचे आपल्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे मनमोकळे हासणे खूप महत्त्वाचे आहे.
उत्तम रक्ताभिसरण : एक संशोधनानुसार हसणे आणि रक्ताभिसरण यांचा जवळचा संबंध आहे. एका अभ्यासात दोन गटांमध्ये विभागलेल्या लोकांवर संशोधन कऱण्यात आले. पहिल्या गटातील लोकांना कॉमेडी कार्यक्रम दाखवण्यात आला, तर दुसर्या गटाला नाटक. संशोधनानुसार कॉमेडी कार्यक्रम पाहणार्या सहभागी लोकांचे रक्ताभिसरण हे इतर सहभागी लोकांच्या तुलनेत खूप जास्त चांगला होता.
तणाव होतो दूर : तणाव, वेदना आणि भांडणे आदींना दूर ठेवण्याची क्षमता हसण्यामध्ये आहे. हसणे आपल्या शरीर आणि मेंदूवर जो उत्तम प्रभाव पडतो तितका कोणत्याही औषधाचा होत नाही. हसण्यामुळे समाजात मिसळतो तसेच लोकांशी मिसळण्यामुळे आपल्याला तणाव आणि नैराश्येसारख्या समस्या कमी होतात. मनमोकळे हसल्याने सर्व तणाव दूर होतो आणि तणावमुक्त होतात. त्यामुळे तणावाचे जे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होतात त्यापासून बचाव होतो.
प्रतिकारक्षमता वाढते ः एका अभ्यासानुसार कर्करोगाच्या पेशी आणि इतर हानिकारक जीवाणू नष्ट होण्यासाठी रक्तातील ऑक्सिजन आवश्यक असते. हसल्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, त्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. एवढेच नव्हे, तर 'लॉईट' या मासिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार हसताना आपण दीर्घ श्वसनाचा व्यायाम करत असतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, त्यामुळे आपण दीर्घकाळ ताजेतवाने आणि ऊर्जामय राहतो.
वेदनेपासून आराम : कंबरदुखी किंवा स्पाँडिलायसीससारख्या वेदनादायक त्रासांमध्ये आराम मिळण्यासाठी हसणे हा एक प्रभावी उपाय आहे. डॉक्टरही लाफिंग थेरपीच्या मदतीने या रुग्णांना आराम मिळण्यासाठी वापर करतात. एवढेच नाही, तर दहा मिनिटे मनमोकळे हसल्यास दोन तास तरी वेदनांपासून आराम मिळतो. त्यामुळे छान झोपही येते.
हृदयाची मजबुती ः हसल्यामुळे हृदयालाही व्यायाम होतो. रक्ताभिसरण चांगले होते. हसल्यामुळे एन्डोमॉर्फिन नावाचे रसायन स्रवते, त्यामुळे हृदय मजबूत होते. काही संशोधनांनुसार त्यामुळे हृदयाचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
रोगांपासून बचाव ः सकाळच्या वेळेत हास्य ध्यानयोग केल्यास दिवसभर व्यक्ती प्रसन्न आणि उत्साही राहते. तर रात्री योग केल्यास झोपही चांगली लागते. हास्ययोगामुळे शरीरात काही संप्रेरके स्रवतात. त्यामुळे मधुमेह, पाठदुखी तसेच तणावग्रस्त व्यक्तींना फायदा होतो.
सौंदर्यासाठी हसा ः याआधी म्हटल्याप्रमाणे हसल्यामुळे तणाव, नैराश्य कमी होते तसेच शरीरातील प्रतिकारशक्तीत वाढ होते. एवढेच नव्हे, तर मोठ्याने हसणे हा एक प्रकारचा व्यायाम असतो. हसल्यामुळे चेहर्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो तसेच चेहर्यावर लवकर सुरकुत्या पडत नाहीत. त्यामुळे हसणे हे एक नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन आहे, असे म्हणता येईल. जास्तीत जास्त हसणारे लोक जास्त काळ तरुण दिसतात.
तंदुरुस्ती वाढते ः आनंदी राहिल्याने जास्त तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण राहतो. मोकळेपणाने जीवन जगणारे लोक म्हातारपणी अधिक सक्रिय राहतातच, पण वेगाने चालूही शकतात. तसेच त्यांना रोजची कामे उदा. गादीवरून उठणे, कपडे घालणे, अंघोळ करणे आदी गोष्टी सहजपणे करू शकतात. रोज एक तास हसल्याने चारशे उष्मांक इतकी ऊर्जा खर्च होते. त्यामुळे वजनही आटोक्यात राहते. आजकाल हास्य क्लबही आयुष्यातील हसण्याची कमतरता भरून काढताना दिसतात.
सकारात्मक ऊर्जा ः मजा मस्ती केल्याने आपल्या हृदय आणि मेंदू यांच्यावरील ओझे कमी होण्यास मदत होते, त्यामुळे आनंदी राहिल्याने अंतर्गत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकारात्मकता ठेवून आपण जे काही काम करतो त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. हसल्यामुळे शरीर शिथिल होते. त्यामुळे काही वेळ मनमोकळेपणाने हसल्याने स्नायू 45 मिनिटांपर्यंत शिथिल होतात, त्यांना आराम मिळतो. त्याशिवाय हसल्याने आपली प्रतिकारक्षमता वाढते. एक सकारात्मक व्यक्ती आपल्या सभोवतीदेखील आनंद आणि हर्ष पसरवतो. त्यामुळे भरपूर मनमोकळे हसा आणि आजूबाजूलाही आनंद पसरवा.
डॉ. संतोष काळे