वजन कमी करायचंय, हे उपाय करून बघाच! | पुढारी

वजन कमी करायचंय, हे उपाय करून बघाच!

अनेक उपाय केल्यानंतर आणि भरपूर व्यायाम केल्यानंतर आपल्याला वजन कमी करण्यात यश मिळते. वजन कमी झाल्याचा आनंद अवर्णनीय असतो. या आनंदात आपल्या हातून काही चुका होण्याची शक्यता असते. या चुकांमुळे मोठ्या परिश्रमाने कमी केलेले वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते. वजन कमी करणे एकवेळ सोपे मात्र कमी केलेले वजन कायम राखणे अत्यंत अवघड. आपले वजन पुन्हा वाढू नये अशी आपली इच्छा असते. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खालील सूचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

वजन कमी झाले म्हणून व्यायाम थांबवू नका. आपण पूर्वी जसा व्यायाम करत होतो तसाच करत रहा. पुरुषांनी व्यायाम प्रकाराद्वारे दररोज 2000 कॅलरीज जाळल्या पाहिजेत, तर स्त्रियांनी 1600 कॅलरीज जाळल्या पाहिजेत. साध्यासुध्या गोष्टीतूनही आपण कॅलरीज जाळू शकतो. अगदी कार धुण्यातूनही आपण कॅलरी जाळू शकत असतो. कार पुसणे आणि धुणे या साधारण वीस ते तीस मिनिटांच्या क्रियेमध्ये आपल्या सुमारे 300 कॅलरीज जळतात.

नोकरीच्या ठिकाणी तसेच आपल्या राहण्याच्या ठिकाणी लिफ्टचा वापर टाळून जिन्याचा वापर केला पाहिजे. जिन्याच्या वापरामुळे आपल्या 100 कॅलरीज जळू शकतात. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे समतोल आहार. कार्बनचे प्रमाण अधिक असणारी शीतपेये पिऊ नका. अशा पेयांमुळे शरीरातील फॅट वाढून वजनही आवाक्याबाहेर जाऊ शकते. अशा पेयांऐवजी ताज्या फळांचा रस पिणे केव्हाही फायदेशीर ठरते. शीतपेयांमुळे डायबेटिससारखी व्याधी कायमची मागे लागण्याची शक्यता असते.

एकाच वेळी भरपूर जेवण्याऐवजी दोन-दोन तासांच्या अंतराने थोडे थोडे खात रहा. अशाने अन्नाचे पचनही चांगले होते. घरचे जेवण टाळू नका. घरी एक दिवस जेवला नाहीत म्हणजे वजन कमी होईल अशा गैरसमजात राहू नका. रात्री भरपेट जेवू नका. रात्री आठच्या आधी हलकेसे जेवून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवण झाले पाहिजे. म्हणजे अन्न चांगले पचते. दुपारी जेवल्या जेवल्या झोपू नका. अशाने शरीरातील फॅट वाढण्याची शक्यता असते.

डॉ. प्राजक्‍ता पाटील

Back to top button