बेळगावात आठ दिवसांत कोरोना लॅब

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याचे पाहून जिल्हा आरोग्य खात्याने बेळगावमध्ये कोरोना लॅब सुरू करण्याचा प्रस्ताव  पाठवला आहे. त्यानुसार 10 दिवसांत बेळगावात कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित होईल. त्यासाठी जिल्हा रुग्णालयातील चार कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासाठी शिमोगा येथे पाठवण्यात आले आहे, अशी  माहिती  संसर्गजन्य विकार विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण तुक्‍कार यांनी 'पुढारी'ला दिली.

शिमोग्याला गेलेल्या कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण चार दिवसांत पूर्ण होणार असून आठ दिवसांमध्ये प्रत्यक्षात बेळगावमध्ये अहवाल तपासणी सुरू होणार आहे. 

बेळगावमध्ये रुग्णांची आणि संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रोज तपासणीचे स्वॅब शिमोगा किंवा बंगळूरला पाठवावे लागत आहेत. कर्नाटकामध्ये सध्या बंगळूर, शिमोगा, हासन आणि म्हैसूर या चार ठिकाणी कोरोना तपासणी होते; पण आता रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अहवाल येण्यास वेळ लागत आहे.  

बेळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 79 जणांचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते यातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 69 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 279 जणांना घरात अलिप्त करण्यात आले आहे, तर 38 जणांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली

मिरजमध्ये लॅब सुरू…. 

शुक्रवारपासून मिरजमध्ये कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी कर्नाटकातील विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. बेळगावचेही नमुने पाठवण्याची सूचना आहे. मात्र सांगली जिल्ह्यातच रुग्ण  वाढत असल्याने मिरज लॅबवरही ताण येत आहे. त्यामुळे बेळगावचे नमुने बंगळूर, शिमोग्यालाच पाठवले जात आहे. बेळगावमध्ये लॅब  सुरू  झाल्यास आजुबांजुच्या जिल्ह्यातील अहवाल बेळगावलाच येतील.

logo
Pudhari News
pudhari.news