विदेशात अडकलेल्या खलाशांना आणून बोटींवरच विलगीकरणात ठेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा 

'कोरोनाव्हायरस'च्या वाढत्या प्रसारामुळे जगातील अनेक देशांतील जहाजे आणि क्रुजबोटींवर अडकलेल्या गोमंतकीय खलाशांना राज्यात आणण्याचे प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारने करावेत. या खलाशांना राज्यात आणल्यावर 'एमव्ही कर्णिका ' आणि 'एमव्ही आंग्रिया' या बोटींवरच तरंगत्या 'विलगीकरण' केंद्रामध्ये ठेवावे, अशी मागणी अखिल गोवा खलाशी संघटनेने सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. 

अखिल गोवा खलाशी संघटनेचे अध्यक्ष फ्रँक व्हिएगस, संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ, सदस्य व्हेन्जी व्हिएगस आणि अन्य सहकार्‍यांनी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर वाझ यांनी पत्रकारांना सांगितले, की राज्यातील अनेक खलाशी जगात अनेक बोटींवर आणि क्रुज जहाजांवर काम करत असून 'कोरोनाव्हायरस'च्या वाढत्या प्रभावामुळे ते परदेशात व बोटीवरच अडकले आहेत. सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने ते परतू शकत नसल्याने त्यांना मियामी, ऑस्ट्रिया, बहामास, दुबई, युरोप आदी ठिकाणी ठेवण्यात आले आहे. यातील अनेक खलाशी ज्या जहाजावर काम करत होते, त्या जहाजावर 'कोरोना'चा प्रसार झाला होता. अशा खलाशांना 'केशरी' रंगाच्या गटात घालून त्यांना लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर स्वतंत्र विमानाने भारतात आणि राज्यात आणावे.     गोव्यात आणल्यावर या खलाशांना स्वतंत्र 'विलगीकरण' केंद्रात ठेवण्यासाठी 'एमव्ही कर्णिका' आणि 'एमव्ही आंग्रिया' या प्रवासी बोटींचा वापर करावा. या तरंगत्या 'विलगीकरण' केंद्रामध्ये दोन्ही बोटींत मिळून सुमारे 2500 ते 3000 खोल्या उपलब्ध होणार असून त्याचा या खलाशांना उपचारासाठी वापर करणे शक्य असून राज्य सरकारने या मागणीवर तातडीने विचार करावा, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष फ्रँक व्हिएगस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news