कोरोना : पाच चाचणी यंत्रे, दोन हजार किट्सची खरेदी

पणजी : पुढारी वृत्तसेवा 

गोव्यातील 'मोलबियो' या कंपनीने तयार केलेली 'कोरोनाव्हायरस'ची चाचणी करणारी पाच यंत्रे आणि तात्काळ अहवाल देणारे 2 हजार 'चाचणी किट्स' आरोग्य खात्याने विकत घेतले आहेत. ही यंत्रे मंगळवारपर्यंत गोमेकॉत (1), फोंडा उपजिल्हा इस्पितळात (2) आणि म्हापसातील आझिलो इस्पितळात (2) तैनात केली जाणार आहेत. या नव्या यंत्रसामुग्रीमुळे 'कोरोनाव्हायरस'संबंधी अहवाल एका तासात मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी 'व्हीडिओ संदेशा'द्वारे सोमवारी दिली. 

राणे म्हणाले, की राज्यातील संभाव्य 'कोरोनाव्हायरस' संशयितांना शोधून काढण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या कार्यात खुद्द गोव्यात उत्पादन करणार्‍या 'मोलबियो' या कंपनीचे सहाय्य सरकारला मिळाले आहे. या कंपनीकडून 'कोरोनाव्हायरस'ची चाचणी करणारी पाच यंत्रे आणि तात्काळ अहवाल देणारे 2 हजार 'चाचणी किट्स' आरोग्य खात्याला मिळालेले आहेत. ही सर्व यंत्रे आणि किट्स राज्यातील विविध इस्पितळांत 24 तासांत बसवली जाणार असून यामुळे संशयित रुग्णांचे लवकर 'स्क्रीनिंग' करण्यास खात्याला मदत होणार आहे. 

राणे म्हणाले, की गोमेकॉतील 'व्हायरोलॉजी' प्रयोगशाळेत सोमवारी 26 संशयितांच्या रक्त आणि थुंकीचे नमुने तपासण्यात आले असून सर्व अहवाल 'निगेटिव्ह' आले आहेत. अन्य राज्यांत 'कोरोना'च्या वाढत्या प्रसाराच्या तुलनेत गोव्यात सध्या फक्त सात 'पॉझिटिव्ह' रुग्ण असून नव्याने रुग्ण सापडलेला नाही. राज्यात सध्या मास्कचा तुटवडा भासत असून राज्यातील स्वयंसेवी गटांना मास्क तयार करण्यास सांगितले आहे. या गटांतर्फे तयार करण्यात आलेले मास्क सुरवातीला '108'च्या रुग्णवाहिकांतील कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news