कोचिवेली एक्स्प्रेसमधील ‘त्या’ सर्व प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह

सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 63 पैकी 61 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक अहवाल अद्याप येणे बाकी आहे.  आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ एक अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता; मात्र तो रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. तर रत्नागिरीतील त्या पॉझिटिव्ह रुग्णासोबत कोचिवेली एक्स्प्रेसमधील डब्यातून प्रवास केलेल्या जिल्ह्यातील सर्व व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाने पाठवलेले आणखी पाच आहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णासोबत कोचिवेल्ली एक्स्प्रेसमधून प्रवास केलेल्या व्यक्तींचेही अहवाल निगेटिव्ह आहे आहेत. रुग्णालयाने पाठवलेल्या 63 पैकी फक्त एका नमुन्याचा अहवाल बाकी असून इतर सर्व अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये नव्याने एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही. 

विलगीकरण कक्षामध्ये सध्या 22 व्यक्ती दाखल आहेत. तर 337 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये 53 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. अलगीकरणाचा कालावधी संपवलेल्या व्यक्तींची संख्या 80 आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत सोमवारी एकूण 2010 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अनेक मजूर, कामगार, बेघर यांच्या राहण्याची व जेवणाची अडचण निर्माण झाली होती.

या सर्वांच्या जेवणाची व निवासाची सोय व्हावी यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने 15 कॅम्प उभारले आहेत. या कॅम्पमध्ये सुमारे साडेपाचशे मजूर, बेघर यांच्या निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. पण, अडकून पडल्यामुळे यांच्यावर मानसिक ताण येत आहे. त्यांचा हा मानसिक ताण कमी करण्यासाठी या लोकांचे सामुपदेशन करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत महिला व बाल विकास अधिकारी यांनी नेमणूक केलेल्या 6 समुपदेशकांनी 48 व्यक्तींचे समूपदेशन केले आहे. या समुपदेशनामध्ये वैयक्तिक संवाद साधून कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्याचे  उपाय, घ्यावयाची काळजी, घरच्यांची वाटणारी चिंता, सकारात्मक वेळ कसा घालवावा, स्वच्छतेबाबतच्या सवयी, मास्क, साबण, हॅन्डवॉशचा वापर, वाचन करणे या विषयी सामुपदेशन करण्यात आले. समुपदेशन करण्यात आलेल्या सर्वांची मानसिक स्थिती सध्या चांगली आहे. तसेच ज्यांना गरज भासत आहे अशा लोकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी 02362-228869 या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

घरीच अलगीकरण करण्यात आलेले                      337       

संस्थात्मक अलगीकरणात असलेले                        53       

पाठविण्यात आलेले एकूण नमुने                            63       

अहवाल प्राप्त झालेले नमुने                                  62       

पॉझिटिव्ह आलेले नमुने                                        1       

निगेटिव्ह आलेले नमुने                                         61       

अहवाल प्राप्त न झालेले नमुने                               01       

विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण                           22       

आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती     2010     

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news