कोरोना नियंत्रण; पोलिस 24 तास रस्त्यांवर

सांगली : शशिकांत शिंदे

'कोरोना' चा प्रसार रोखण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि विशेष पोलिस  दल 24  तास रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत. त्यांच्या या कडक भूमिकेमुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे दिसते आहे. 

'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 22 मार्चरोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण देशात वाढत असल्याचे पाहून विषाणू संसर्ग आणि प्रसाराची साखळी मोडून काढण्यासाठी दि. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय  जाहीर झाला. संचारबंदी लागू करण्यात आली. लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊन यशस्वी करण्यात जिल्हा प्रशासनाचे जोरदार  प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये पोलिस यंत्रणा महत्वाची भूमिका बजावते आहे.  

जिल्ह्यातील 2 हजार 700 पोलिस  रस्त्यावर उतरून रात्रंदिवस पहारा देत आहेत. त्यांच्या रजा-सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचा सीमाभाग आणि अंतर्गत भागात पोलिस तैनात आहेत. स्वत:च्या कुटुंबाची काळजी करायला देखील त्यांना वेळ  नाही. ते पोलिस नागरिकांना मात्र घरातून बाहेर पडू नका, असे   आवाहन करीत आहेत. त्यांच्या  मदतीला 240 होमगार्ड आणि 1हजार 600 विशेष पोलिसही मैदानात उतरले आहेत. गरज असेल त्यालाच बाहेर सोडले जात आहे. विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई केली जात आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, पोलिस उपअधीक्षक  अशोक वीरकर, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, राजेंद्र तनपुरे, मिरज येथे पोलिस निरीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी  हे सकाळ आणि संध्याकाळ  वेगवेगळ्या भागात फिरून ध्वनीक्षेपकावरून लोकांना घरात थांबण्याचे कळकळीचे आवाहन करीत आहेत. शहरात चौका-चौकात आणि ठिकठिकाणी पोलिस थांबलेले असतात. त्याशिवाय पेट्रोलपंप, भाजी विक्री केंद्र या ठिकाणीही पोलिस असतात.

एका शहरातून दुसर्‍या शहरात आणि बाहेरील जिल्ह्यातून ये- जा करण्यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी 40 ठिकाणी तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. त्याशिवाय 77 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कडक तपासणी करूनच पुढे सोडले जात आहे. विनाकारण फिरणार्‍या तरुणांना उठाबश्या काढण्याची शिक्षा आणि लाठीचा प्रसाद दिला जात आहे. 

इस्लामपूर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी  बंदोबस्त आणखी कडक केला. संबंधित रुग्णांच्या घरापासूनचा दीड किलोमीटरचा परिसर  संवेदनशील म्हणून जाहीर करीत लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. सर्व लोकांची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय त्या बाहेरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर केला. पोलिसांनी  काटेकोर नियोजन करून कोरोनाचा प्रसार इस्लामपूर बाहेर होणार नाही, याबाबत आटोकाट काळजी घेतली आहे.

अत्यावश्यक कारणासाठी लोकांना पास दिले जात आहेत. त्यासाठी पोलिस दलाने वेबसाईट सुरू केली आहे. त्यावर आतापर्यंत दोन हजार अर्ज आले होते. त्यावर तत्काळ निर्णय घेऊन ऑनलाईन परवाने देण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना पुढे सोडले जात आहे.   

राज्य शासनाने सरकारी विभागातील  5 टक्के लोकांना कामावर येण्यास सांगितले आहे. पोलिस दलात  मात्र  रजेवर गेलेल्या पोलिसांना नोटिसा पाठवून कामावर परत बोलावले आहे.  सुट्याही रद्द केल्या आहेत. तीन शिफ्टमध्ये पोलिस रस्त्यावर उतरून सलग 24 तास ड्युटी बजावत आहेत.

सर्वांच्या भल्यासाठी घरीच थांबा : सुहेल शर्मा 

पोलिस अधीक्षक शर्मा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार संचारबंदीस लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आपण कोरोनाला नियंत्रणात ठेवू  शकलो आहेत. यापुढील काळातही लोकांनी सर्वांच्याच  भल्यासाठी पुढील काही दिवस घरीच थांबावे. प्रशासनास सहकायर्र् करावे.   

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news