पुणे : ससूनचा सुरक्षा जवान कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : पुढारी वृत्तसेवा

ससून रुग्णालयात नर्स आणि वरिष्ठ डॉक्टर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता ससूनच्या कोविड इमारतीच्या येथील एका सुरक्षा जवानाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला येथील पॉझिटिव्ह वॉर्ड मध्ये दाखल केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

ससूनमध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) सुमारे 50 ते 60 सुरक्षा जवान रुग्णालयात ठिकठिकाणी तैनात आहे. ससूनची नवीन 11 मजली इमारत कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी देण्यात आली असून तिला 'कोविड हॉस्पिटल' असेही म्हटले जाते. या इमारतीमध्ये 100 पेक्षा अधिक रुग्ण दाखल असून त्यावर उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह आलेला जवान या इमारतीच्या ग्राउंड फ्लोरला असलेल्या ओपीडीमध्ये आणखी एका जवानासोबत तैनात होता.  

या जवानाने येथे काही दिवस ड्युटी केल्यावर त्याला दुसऱ्या ठिकाणी ड्युटी देण्यात येणार होती. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती पण बाधित रुग्णाच्या इमारतीमध्ये कार्यरत असल्याने त्याच्या स्वॅबची तपासणी केली असता त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यासोबत आणखी दोघांची चाचणी केली आसून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली आहे. 

 

logo
Pudhari News
pudhari.news