कर्नाळच्या बाधिताचे सर्व कुटुंब ‘निगेटिव्ह’

सांगली / मिरज : पुढारी वृत्तसेवा

कर्नाळ (ता. मिरज) येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची पत्नी, मुले, वडील, आजोबा, भाऊ यांच्यासह कुटुंबातील सर्व 8 व्यक्तींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. कुपवाडमधील वाघमोडेनगरातील कोरोना बाधितच्या संपर्कातील 29 व्यक्तींचा चाचणी अहवालही निगेटिव्ह आला आहे. कोटा (राजस्थान) येथून आलेले 14 विद्यार्थीही निगेटिव्ह आले असून त्यांना घरी सोडले आहे. मुंबईस्थित कोरोनाबाधित एका पोलिस उपनिरिक्षक दांपत्याच्या दोन मुलांना मिरजेत मावशीकडे आणले असून त्या तिघांना क्रीडा संकुलमध्ये संस्था क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे तसेच प्रांत, तहसीलदार यांनी सोमवारी कर्नाळला भेट देऊन कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. डॉ. मिलिंद पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळ येथे आरोग्य विभागाच्या वीस पथकांमार्फत कंटेनमेंट झोन व बफर झोनमध्ये सर्वेक्षण झाले. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हायरिस्क 17 व्यक्तींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी बाधिताच्या कुटुंबातील 8 व्यक्तींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरीत 9 व्यक्तींचा चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 'लो रिस्क' 84 व्यक्तींना होमक्वारंटाईन केले आहे. 

मुंबई पोलिस दलात काम करणार्‍या उपनिरीक्षकास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या पत्नीलाही लागण झाली. मुंबईत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने या दाम्पत्याच्या दीड वर्षे व दहा वर्षे वयाच्या दोन मुलांना मिरजेतील रविंद्रनगर परिसरात मावशीकडे मुंबई पोलिसांनी आणून सोडले. त्यांनी त्याबाबत प्रशासनालाही कळविले. महापालिका आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून दोन्ही मुले व त्यांच्या मावशीला मिरजेत क्रीडा संकुलात संस्था क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे.

वाघमोडेनगर कुपवाड येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील 29 व्यक्तींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यापैकी 26 पैकी संस्था क्वारंटाईनमध्ये, तर 3 व्यक्ती आयसोलेशन वॉर्डमधील आहेत. 

कोरोना पॉझिटिव्ह मुंबईस्थित  एका व्यक्तीचे जवळचे नातेवाईक 'कोतीज' (ता. कडेगाव) येथे आले आहेत. त्यांच्या संपर्कातील 11 व्यक्तींना कडेगाव येथे संस्था क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यांच्या टेस्ट रिपोर्टकडे लक्ष लागले आहे. राजस्थानमधील कोटा येथून आलेल्या 14 विद्यार्थ्यांचा चाचणी अहवालही कोरोना निगेटिव्ह आला आहे.  

बाधिताची पत्नी, मुले, भाऊ, वडील, आजोबा सारेच  निगेटिव्ह

कर्नाळ येथील बाधित व्यक्तीची पत्नी, दोन मुले, भाऊ, वडील, आजोबा, आत्या, आत्याचे पती यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. कुटुंबातील सर्व 8 सदस्य कोरोना निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.  

बुधगाव, बेडगचे 9 टेस्ट रिर्पोर्ट प्रतीक्षेत कर्नाळ येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील बुधगाव येथील 4 व्यक्ती व बेडग येथील 5 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. टेस्ट रिपोर्टची प्रतीक्षा आहे. 

कर्नाळचा परिसर कंटेन्मेंट झोन 

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी कर्नाळ परिसरात कंटेनमेंट झोन व बफर झोन जाहीर केला आहे. कंटेनमेंट झोन : (1) कर्नाळ पाण्याची टाकी ते मौजे डिग्रज शिवकडे जाणारा रस्त्यांची दोन्ही बाजू, (2) नांद्रे व मौजे डिग्रज रस्ता चौक पर्यंतचा भाग, (3) दक्षिण बाजूस पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा ओढा, बफर झोन पुढीलप्रमाणे : (1) कर्नाळ ते सांगली रस्ता-रजपूत मंगल कार्यालयाजवळ 2 कि.मी, (2) कर्नाळ ते बुधगाव रस्ता- अंकुश हरिबा जाधव घराजवळ 1 कि.मी, (3) कर्नाळ ते बिसूर रस्ता-रमेश पांडुरंग रणदिवे घराजवळ 500 मीटर, (4) कर्नाळ ते नांद्रे रस्ता-कर्नाळ ओढा पुलावर 1 कि.मी, (5) कर्नाळ ते मौजे डिग्रज- मौजे डिग्रज शिवजवळ 2 किलोमीटर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news