‘पीसीओडी’ विकार आणि आयुर्वेद | पुढारी | पुढारी

‘पीसीओडी’ विकार आणि आयुर्वेद | पुढारी

डॉ. आनंद ओक

मासिक पाळीच्या तक्रारींच्या कारणांचा विचार करता आजकाल जास्त प्रमाणात आढळून येत असलेले कारण म्हणजे ‘पीसीओडी’ म्हणजेच ‘पॉलिसिस्टिक ऑव्हॅरिअन डिसीज ’ या विकारावर अनेकवेळा शास्त्रीय आयुर्वेदिक उपचार उत्तम उपयोगी पडतात, असे लक्षात येते. 

गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला स्त्रीबीज तयार करणार्‍या ज्या ग्रंथी असतात त्यांना ओव्हरीज असे म्हणतात. ज्या विकारात या ओव्हरीजच्या रचनेत बिघाड होऊन या ग्रंथीमध्ये अनेक छोट्या छोट्या स्राव असलेल्या गाठी म्हणजेच सीस्ट तयार होतात. व ज्यामुळे या ग्रंथीचे स्त्रीबीज निर्मितीचे कार्य बिघडते त्या विकारास पीसीओडी असे म्हटले जाते. या विकारामुळे या ग्रंथीमध्ये तयार होणार्‍या अ‍ॅड्रोजेन या हार्मोनचे उत्पादन वाढते व याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊन सर्व शरीराच्या विविध तक्रारी उत्पन्न होतात या अवस्थेला पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम असे म्हटले जाते. तरुण मुली अथवा मुल बाळ न झालेल्या स्त्री यात आढळतात.

पीसीओडीमुळे कोणता त्रास होतो?

या अवस्थेत मासिक पाळीशी निगडित हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण झाल्याने मासिक पाळीच्या विविध तक्रारी उत्पन्न होतात.

मासिक पाळी वेळच्या वेळी न येता उशिरा येणे, मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्राव कमी होणे, एका दिवस मासिक स्त्राव होणे, औषधे घेतल्याशिवाय मासिक पाळी न येणे, काही महिलांमध्ये अधूनमधून अल्प रक्तस्त्राव होणे (स्पॉटिंग), गर्भधारणा न होणे, अशा तक्रारी कमी अधिक प्रमाणात होत असतात. शरीरावर चरबीचे प्रमाण साधारणपणे वाढलेले असते वजन वाढल्यामुळे, निरुत्साह, जडपणा, कार्यक्षमता कमी होणे, दम लागणे, काहीजणांत स्थूलपणामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी अशा तक्रारी जाणवत असतात. काही महिलांत चिडचिडेपणा वाढलेला आढळतो. ओठांच्या वरच्या भागात, गालावर, मानेवर जास्त केस येणे असा परिणामही आढळत असतो. मान, मांडीच्या आतला भाग, काख येथील त्वचा जाडसर होऊन तिचा रंग बदलेला असतो. या विकाराच्या महिलांमध्ये काही वेळा इन्शुलीन रेसिस्टंसमुळे मधुमेहाच्या तक्रारी ही आढळून येतात.

पीसीओडीचे निदान 

पोटाची सोनोग्राफी ही तपासणी केली असता ओव्हरीजना छोट्या गाठी असल्याचे आढळते. म्हणजेच साधारणपणे पीसीओडी ही अवस्था लक्षात येते. काही वेळा स्थूलपणा अति वाढलेला असल्यास ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफीने या विकाराचे निदान होते. रक्तातील एलएच, इस्ट्रोजेन टेस्टोस्टेरॉन, इन्शुलीन यांचे प्रमाण बघण्यासाठी रक्ताच्या तपासणी केल्यावरही पीसीओडीचे निदान होते.

पीसीओडीचे दुष्परिणाम

अनेक महिलांमध्ये पीसीओडीचे निदान झाल्यानंतर त्यावरील उपचार दीर्घकाळाचे असल्याने उपचार घेण्याचा कंटाळा केला जातो. अथवा दुर्लक्ष केले जाते. दीर्घकाळ पीसीओडी राहिल्यास गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तसेच मधुमेहदेखील होऊ शकतो. रक्तातील चरबीचे परिणाम वाढत जाऊन ब्लडप्रेशर वाढते. क्वचित भविष्यात हृदयविकारही उत्पन्न होण्याची शक्यता असते. याचबरोबर स्थुलपणामुळे, शरीर बेढब होते. चेहर्‍यावरील केस, त्वचेवरील डाग यामुळे सौंदर्य समस्याचे देखील उत्पन्न होऊन व्यक्तिमत्त्व बिघडते. अनेकदा आहारातील चुका, जंकफुडचा अतिरेक, अजिबात व्यायाम न करणे यातून स्थुलपणा वाढत जातो. हा स्थुलपणा दुर्लक्षण्यामुळे होणार्‍या हार्मोन्सच्या असंतुलनातून पीसीओडीची उत्पत्ती होते. यावर वेळीच निदान न झाल्याने पीसीओडी मुळे वाढणार्‍या चरबीची मूळ स्थूलपणात भर पडून वजन अधिक वाढते. वाढलेले वजन कमी होत नसल्याने निर्माण होणारे नैराश्य, चिडचिडेपणा यामुळे मानसिक तणाव ग्रस्तता वाढते. यातूनच हॉर्मोन्समधील अंसतुलन अधिक वाढण्यास मदत होते. हार्मोन्सचा असंतुलनाचा दुष्परिणाम मासिक पाळीवर होतो. ज्यामुळे पाळी उशिरा येते, किंवा येत नाही किंवा रक्तस्त्राव कमी होतो. यामुळे देखील स्थुलपणात अधिकच वाढ होते.

आयुर्वेदिक उपचार

या विकारामुळे द़ृष्टचक्र भेद न करण्यासाठी वाढलेला स्थुलपणा कमी करणारी, ओव्हरीतील गाठी कमी करणारी, रजःप्रवर्तन करणारी, हार्मोन्समध्ये संतुलन निर्माण करणारी तणाव नियंत्रण करणारी कफमेदनाशक औषधे युक्तीने संयुक्त स्वरुपात वापरावी लागतात. यासाठी आयुर्वेदातील कुमारी, कांचनार, वरुण, निर्गुडी, त्रिफळा, गुगुळ, त्रिमद, विडंग, ब्राम्ही कुम्भा, हरिद्रा, असनार, लोध्र, गाजरबीज, काळाबोळ, इ. वनस्पती तसेच मासिक, ताम्र, लोह, शिलाजीत इ. पासून तयार केलेले गोळ्यांच्या स्वरुपातील औषधे वापरावी लागतात. मेद कमी करणार्‍या औषधी तेलाने सर्वागाला मसाज, औषधी काठ्याच्या वाफेने शेक देणे. तसेच गरजेप्रमाणे काही वेळा तेलवस्ती, निरुहवस्ती, शिरोधारा यांचा युक्तीने उपयोग केला जातो. मेदनाशक होण्यासाठी तणावाचे नियंत्रण होऊन हार्मोन्सचे संतुलन निर्माण व्हावे. यासाठी पंचकर्म उपचारांची मदत होते.

पवनमुक्तासन, कन्धरासन, शगकासन, द्विचक्रीकासन, अर्धहलासन, पादवृत्तासन व क्रासन धनुरासन ही योगासने नियमितवेळी करणे जोडीला प्राणायाम तसेच सूर्यनमस्कार, चालणे, पळणे, पिंगा घालणे, उठाबशा काढणे, पोटाचे व्यायाम यांचा नियमित उपयोग केल्यास अधिक फायदा होतो. 

तळलेले पदार्थ, स्वीटस्, जंक फुडस्, मांसाहार कटाक्षाने टाळून नियमित वेळी समतोल असा आहार घ्यावा.

Back to top button