सकारात्मक मानसिकता गरजेची  | पुढारी | पुढारी

 सकारात्मक मानसिकता गरजेची  | पुढारी

सांगली : पुढारी वृत्तसेवा 

देशभरातील शहरी ग्रामीण भागासह वाड्या-वस्त्यांमध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेला  संसर्गजन्य रोगाचा विविध स्तरावर खबरदारीचा उपाय म्हणून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत शासनाने अधिग्रहित केलेल्या खासगी रुग्णांलयाना देण्यात येणारे शासकीय अनुदान तोकडे आहे. त्यात वाढ केल्यास शासनाने सर्व सामान्यांना देखील अशा रुग्णालयातील उपचार सुविधांचा लाभ घेता येईल. मृत्यूदर घटून या महारोगराईच्या संकटावर मात करणेही शक्य होईल. सर्वांनी सकारात्मक मानसिकता बाळगणे तितकेच गरजेचे असल्याची अपेक्षा कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीनिकेतन काळे यांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केली.

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासाठी काय करावे लागेल?

संबंधित बातम्या

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या वाढीचा विचार करताना जिल्हा प्रशासनाने मार्फत काही खासगी रुग्णालये अधिग्रहित करुन त्याठिकाणी कोरोना बाधितांवर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत तेथील तपासणी औषधोपचार व अन्य वैद्यकीय सोयीसुविधा गोरगरिबाच्यादृष्टीने खर्चाच्या बाबतीत आवाक्याबाहेरच्या ठरत असतात. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना शासकीय अनुदान देताना त्यात वाढ केल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्यादृष्टीने आधार ठरणार आहे. शासन प्रति बेडला दोन हजार रुपये अनुदान देते. औषधे उपचार, तपासणी, ऑक्सिजनसाठी खासगी रुग्णालयांना शासकीय दर अदा केला जातो, त्यामुळेच उपचारावरही मर्यादा येत असतात. 

* व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या सुविधेमुळे लाभदायक बाब कोणती?

 अत्यावश्यक व गंभीर रुग्णांना कृत्रिम श्वासो श्वासाची गरज असते. व्याधिनुसार रुग्ण आजारातून बाहेर पडणे  तसे अशक्य असले तरी वैद्यकीय उपचार सुरू ठेवावे लागतात. यातही हायफ्लो ऑक्सिजन,  व्हेंटिलेटरचे विभाग ठरलेले असतात. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे कमतरता भासू नये, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणेने लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

* कोरोनाबाधित रुग्ण प्रामुख्याने दगावण्याची कारणे  काय असू शकतील? 

कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या 55 ते 70 वयोगटातील काही लोकांना अगोदरच मधुमेह,  हृदयविकार, रक्तदाब यासारख्या व्याधी जडलेल्या असतात. त्यातच रोगप्रतिकारशक्ती  क्षीण असल्याने अशा व्यक्तींच्या शरीरात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कोरोनासारखे विषाणू शिरकाव केल्याने अशा वयोगटातील रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक असू शकते. हेच प्रमाण तरुणांमध्ये 2 ते 3 या तर वयोवृद्धांमध्ये 7 ते 8 प्रमाण असू शकते.

कोरोनापासून बचावासाठी दिनचर्येत कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावे?

कोरोना जर मात करायची असेल तर घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर गरजेचा आहे गर्दी टाळणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, प्रवास टाळणे, विनाकारण फिरणे व अन्य बाबींना फाटा देणेही गरजेचे बनले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी स्वतःबरोबरच कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य यंत्रणा, पोलीस दलाला सहकार्य प्रत्येकाने केले पाहिजे.

डॉक्टर- रुग्ण – नातेवाईकामध्ये समन्वय आवश्यक : आजार अथवा व्याधी कोणत्याही प्रकारच्या असोत डॉक्टर हे एखादया देवदूता प्रमाणे रुग्णांना त्याच्या आजार व व्याधी नुसार योग्य त्या औषधोपचार, शस्त्रक्रियेद्वारे जीवदान देण्याचे काम करीत असतात. उपचाराबाबत जनतेच्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण होत असतात हे टाळण्यासाठी डॉक्टर, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये समन्वय असणे तितकेच गरजेचे आहे.

काय करता येईल

 मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन अत्यावश्यक आहे.

 आरोग्य यंत्रणा, पोलिस यांना सहकार्य करावे.

 कोरोनाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.

 डॉक्टर हे देवदुताप्रमाणे काम करतात. त्यांच्यावर विश्‍वास ठेवा.

 उपचार सुरू असताना डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक यांच्यामध्ये समन्वय हवा.

 कोरोनाला हरवण्यासाठी स्वतःबरोबरच कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे

 शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न हवे

Back to top button