हाडांचा क्षयरोग निदान आणि उपचार | पुढारी

हाडांचा क्षयरोग निदान आणि उपचार

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात क्षयरोगाचे 20 लाखांहून अधिक रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी 20 टक्के म्हणजे तब्बल 4 लाख लोकांना मणक्याच्या हाडांचा क्षयरोग असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांचा मृत्युदर 7 टक्के आहे. 2016 मध्ये 76 हजार मुलांना मणक्याचा क्षयरोग झाला होता. केस आणि नखे वगळता क्षयरोग शरीराच्या कोणत्याही भागात पसरू शकतो. योग्य वेळी त्यावर उपचार न केल्यास किंवा उपचार अपूर्ण सोडतात त्यांचे मणक्याचे हाड विरघळून कायमस्वरूपाचे अपंगत्व येऊ शकते. हा विकार कोणत्याही वयात होऊ शकतो. 

हाडांना होणार्‍या क्षयरोगाला बोन टीबी किंवा अस्थिक्षयरोग असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे मणक्याचे हाड, हात, मनगटे आणि कोपरे आदी सांध्यांवर त्याचा अधिक परिणाम होतो. योग्य वेळी क्षयरोगाचे निदान आणि त्यावर उपचार झाल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो. 

कोणत्या लोकांना अधिक धोका?  क्षयरोगाच्या आजाराची सुरुवात फुफ्फुसापासून होते. हळूहळू रक्‍तप्रवाहातून हा आजार शरीराच्या इतर भागांपर्यंत त्याचा संसर्ग फैलावतो. हा आजार हरेक वयाच्या व्यक्‍तीवर प्रभाव पाडतो. या आजाराचा धोका 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना आणि 35 ते 50 वर्षांच्या लोकांना अधिक असतो. 

या लक्षणांवर हवी नजर  

ताप, थकवा, रात्री घाम येणे तसेच विनाकारण वजन कमी होणे आदी मुख्य लक्षणे असतात. हाडांच्या एका बिंदूवर असह्य वेदना होतात. जसे ः मनगट. हळूहळू व्यक्‍तीच्या शरीराची ठेवण आणि चालण्याची पद्धत बिघडते. खांदे झुकवून चालणे, पुढच्या बाजूला वाकून चालणे आणि अनेकदा हाडांना थोडी सूजही येते. क्षयरोगाच्या नेमक्या जागेनुसार वेदनेचा प्रकार कळतो. म्हणजे मणक्याच्या क्षयरोगामध्ये पाठीच्या खालच्या बाजूला वेदना होतात. त्यामुळे पीडित व्यक्‍तींच्या फुफ्फुसांनाही संसर्ग होतो. हाडाचा क्षयरोग असणार्‍या व्यक्‍तींना कफ पडत नसल्याने ते क्षयरोगाने ग्रस्त आहेत याची कल्पना येत नाही. त्यामुळे याची प्राथमिक लक्षणे स्पष्ट होण्यासाठीही अनेक वर्षे लागतात. वजन कमी होणे, हालचाल करण्यास त्रास होणे, ताप येणे आणि जास्त गंभीर रुग्णांमध्ये हात आणि पाय कमजोर झाल्याचे दिसून येते. या रुग्णांना रात्री जास्त वेदना होतात. 

हाडांच्या क्षयरोगाची ओळख 

हाडांच्या क्षयरोगाचे निदान करण्यासाठी एक्स-रे आणि क्षयरोगाचा प्रभाव असलेल्या सांध्यांमधून वाहणार्‍या वंगणाची तपासणी करणे आवश्यक असते. रक्‍ताची तपासणी, इएसआर टेस्ट, एक्स-रे या सर्वांच्या मदतीने या विकाराचे निदान होऊ शकते. मणका आणि स्केलेटल क्षयरोगाच्या बाबतीत सीटी स्कॅन, एमआरआय अहवाल याच्या आधारे उपचारांची प्रक्रिया सुरू होते. हाडांचा क्षयरोग हा आथ्रारायटिस आहे, असे समजण्याची चूक होऊ शकते; पण आथ्रारायटिसच्या रुग्णांना झोपताना वेदना जाणवतात. क्षयरोगाच्या रुग्णांना रात्री जीवाणूंची हालचाल वाढल्याने जास्त वेदना होतात. 

कसे सावध राहावे? 

फुफ्फुसाच्या क्षयरोगापेक्षा हाडांच्या क्षयरोगातील संसर्गाचे गांभीर्य पाहता क्षयरोगावरील उपचाराला वेळ लागतो. सामान्य हाडांच्या क्षयरोगाच्या उपचारासाठी सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो, तर मणक्याच्या क्षयरोगाच्या प्रकरणात लकव्यावरील उपचार आणि रिकव्हरीमध्ये दीड ते दोन वर्षेही लागू शकतात. क्षयरोगाच्या रुग्णांसाठी औषधांचा कोर्स पूर्ण करणे खूप आवश्यक आहे. औषधोपचार मध्येच सोडून देऊ नये. हाडांच्या क्षयरोगात आराम करणे, सकस आहार, नियमित व्यायाम आणि औषधे घेणे, फिजिओथेरेपीचे उपचार घेणे या सर्वांचा उपयोग सामान्य आयुष्य जगण्यासाठी होतो. 

प्रमुख तपासण्या 

हाडांच्या क्षयरोगाची तपासणी करण्यासाठी एक्स-रे, एमआरआय, रेडिओ न्युक्लाईड बोन स्कॅन या तपासण्या केल्या जातात. अर्थात, पेशींची मायक्रोबायोलॉजिकल तपासणी केल्यानंतरच (एएफबी स्टेनिंग, एफबी कल्चर, सेंसिटिव्हीटी, पीसीआर) अंतिम निदान केले जाते. लहान मुले आणि वृद्ध लोक यांच्यामध्ये हा क्षयरोग अधिक प्रमाणात होताना दिसतो. एचआयव्ही आणि मधुमेह पीडित व्यक्‍तींमध्ये हाडांचा क्षयरोग होण्याची शक्यता असते. 

मणक्याला अधिक धोका 

दोन-तीन आठवड्यांपर्यंत पाठीच्या वेदना जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांकडे गेले पाहिजे. आकडेवारीनुसार डॉक्टरांकडे पाठदुखीच्या तक्रारी घेऊन जाणार्‍या 10 टक्के रुग्णांमध्ये मणक्यांच्या हाडांचा क्षयरोग असल्याचे निदान होते. क्षयरोगाची लक्षणे चटकन दिसत नसल्याने सामान्य पाठदुखी असल्याचे रुग्णांना वाटते. त्यामुळे वेदनाशामक गोळ्या घेऊन वेदना शमवण्याचा प्रयत्न केला जातो. वेळेत उपचार न झाल्यास व्यक्‍तीला गंभीर लकवा होऊ शकतो. उपचार न केल्यास संसर्ग मणक्यातून दुसर्‍या हाडांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे हाडे कमजोर होतात आणि मणक्यांच्या मधील चकतीदेखील खराब होते. ज्यांचा आजार गंभीर आहे किंवा बळावला आहे, त्यांच्या पूर्ण मणक्याला इजा होते. मणका संकुचित होतो. शरीराच्या कंबरेखालच्या भागाला लकवा मारू शकतो. मणक्याचे हाड बाहेर येऊन कुबड येण्याची शक्यताही असते. 

थोडक्यात, क्षयरोग म्हणजे फक्‍त फुफ्फुसांचा असे गृहित न धरता क्षयरोगाकडे पाहायला हवे. दीर्घकाळ होणार्‍या पाठदुखीकडे दुर्लक्ष न करता, स्वतःच मनाप्रमाणे वेदनाशामक गोळ्या न घेता डॉक्टरांकडे जाऊन योग्य वेळी योग्य उपचार करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायमचे अपंगत्व येऊन आयुष्य दुष्कर होऊ शकते. मणक्याच्या हाडांच्या क्षयरोगाचा संसर्ग इतरत्रही होऊ शकतो. हाडे कमजोर होत असल्याने वेळीच इलाज केल्याशिवाय पर्याय नाही. योग्य वेळी उपचार न घेणे आणि उपचार अर्धवट सोडणार्‍या रुग्णांना अंपगत्व येऊ शकते.  

 

Back to top button