कोविड काळात आणि नंतर कोणता आहार घ्यावा?

डॉ. भारत लुणावत

कोव्हिडपासून वाचण्यासाठी बहुतांश मंडळी सकस, चौकस, पोषक आहार घेण्याचा सल्ला देत आहेत. हेल्दी फूडमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. परंतु, आपल्या थाळीत मायक्रोन्यूट्रिएंटचा समावेश असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात कोव्हिडच्या काळात आपल्या इटिंग हॅबिट्सवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हीच सवय आपल्याला इम्युनिटी बूस्ट करेल आणि स्ट्राँग करेल. 

डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ आपल्याला नेहमीच पौष्टिक आहाराचा सल्ला देतात. परंतु, तज्ज्ञ मात्र कोरोनाच्या उपचारादरम्यान केवळ पौष्टिक आहार पुरेसा नाही, असे सांगतात. मायक्रोन्यूटिएंटची थाळीची आपल्याला नितांत गरज असल्याचे ते म्हणतात. 

कोरोनाग्रस्त लोकांनी आजारातून बाहेर पडण्यासाठी पौष्टिक आहार करणे गरजेचे आहे. त्यांना प्रोटिन आणि कॅलरीयुक्त भरपूर पौष्टिक आहार जसे की दूध, पनीर, डाळ आदींचे भरपूर सेवन करायला हवे. त्याचबरोबर त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट जसे की कॅल्शियम, आयरन, झिंकची गरज असते. या गोष्टी हिरव्या पालेभाज्या आणि फळांत असतात. त्याचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे कोरानाचे रुग्ण हे वास आणि चव गमावून बसतात. उपचारासाठी औषधे सुरू असल्याने त्यांना जेवण्याची इच्छा राहत नाही. मात्र, थोड्या-थोड्या अंतराने आहार घेत राहिल्यास शरीरात आजाराचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्‍ती कायम राहते. 

पातळ पदार्थ उपयुक्‍त

कोरोनाचा संसर्ग हा रक्‍त गोठवण्याचे काम करतो. त्यामुळे गाठी तयार होण्याची भीती असते. हे क्लॉट हृदयाविकाराचे कारण ठरू शकतात. याशिवाय मेंदूत रक्‍तस्त्राव होण्याची देखील भीती असते. यापासून बचाव करण्यासाठी रुग्णाला पातळ पदार्थ देणे गरजेचे आहे. यात फळांचा रस, लिंबू पाणी, नारळाचे पाणी आदींचे सेवन करायला हवे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णात अशक्‍तपणा येऊ शकतो. केवळ आजारपणातच नाही तर त्यानंतरही काही महिने पौष्टीक आहार आणि पातळ पदार्थांचे सेवन करणे सुरू ठेवणे गरजेचे आहे. पोस्ट कोव्हिडमध्ये अशक्‍तपणा दूर होताच रोगप्रतिकारक शक्‍तीदेखील वाढण्यास मदत मिळते. 

पावसात जरा सांभाळून

हिरव्यागार पालेभाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, पावसाळ्यात थोडे सांभाळूनच त्याचे सेवन करायला हवे. तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात हिरव्यागार पालेभाज्या किंवा अन्य तत्सम पदार्थांमुळे फंगस होण्याची भीती राहते. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस हिरव्या भाज्यांपासून दूर राहणे गरजेचे आहे. परंतु, आपल्याला त्याचे सेवन करायचेच असेल, तर ती पालेभाज्या स्वच्छ करणे आवश्यक आहे. वास्तविक प्रत्येक हंगामात स्वच्छता बाळगणे गरजेची आहे. आपल्या आहारावरही नियंत्रण असावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने चांगला आहार घ्या आणि सुद‍ृढ राहा. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news