लहान मुलांची वारंवार छाती भरणे – कारणे व उपचार

लहान मुलांची वारंवार छाती भरणे – कारणे व उपचार
Published on
Updated on

पेशंटमध्ये छाती भरणे हा शब्द सर्रास वापरला जातो. मेडिकल सायन्समध्ये छाती भरणे असा आजार नसतो. वेगवेगळ्या पेशंटकडून वेगवेगळ्या तक्रारीसाठी हा शब्द वापरला जातो. काही लोक दम लागणे, छातीत शिटी सारखा आवाज येणेे किंवा घरघर वाजणे याला छाती भरणे म्हणतात. काही लोक ओला खोकला असेल तर किंवा बाळाला न्यूमोनिया झाला तर त्याला छाती भरणे म्हणतात. काही लोक चिकट उलटी झाली तरी त्याला छाती भरणे म्हणतात. त्यामुळे प्रत्येक पालकांना मुलाला नक्की काय त्रास आहे हे विचारणे गरजेचे आहे.
वारंवार छाती भरणार्‍या मुलामध्ये काहीना बाल दमा असू शकतो.

बाल दम्याची लक्षणे : वारंवार उद्भवणारा खोकला. विशेषत: रात्री आणि पहाटे श्वास घेणे कठीण होते. 1) खूप दिवस सलग खोकला राहणे. 2) धाप लागल्यासारखे होणे, 3) छातीत शिट्टीसारखा आवाज येणे. 4) रात्री झोपल्यावर छातीत घरघर आवाज येणे. 5) खेळताना किंवा पळताना लवकर दमल्यासारखे होणे.
बालदम्यामध्ये हवामानात बदल, थंड वस्तू, धूळ, धूर, व्हायरल इन्फेक्शन या गोष्टीमुळे हा त्रास वाढतो व ही लक्षणे वाढल्यास त्यातून न्यूमोनिया होऊ शकतो. बालदम्याचे योग्य निदान करून योग्यती ट्रिटमेंट केल्याने बराचसा त्रास कमी होऊ शकतो.

वारंवार होणारा न्यूमोनिया
– ज्यावेळी एखाद्या बाळाला एका वर्षात दोन वेळा किंवा कोणत्याही वेळी तीन वेळेपेक्षा जास्त न्यूमोनिया झाला तर त्याला वारंवार होणारा न्यूमोनिया असे म्हटले जाते. अशा न्यूमोनियाचे पुढील तपास करणे गरजेचे असते.
– ज्यावेळी एखाद्याला झालेला न्यूमोनिया व्यवस्थित उपचार देऊनसुद्धा चार आठवड्यांपर्यंत बरा होत नाही, त्यावेळी त्याला पर्सिस्टंट (न बरा होणारा) न्यूमोनिया असे म्हटले जाते.

वारंवार होणार्‍या न्यूमोनियाची कारणे-
न्यूमोनियाची कारणे आपण वयानुसार बघत गेलो तर अगदी लहान बाळांमध्ये वारंवार न्यूमोनिया होत असेल तर त्याचे कारण श्वासनलिका व अन्ननलिका यामधील जन्मतः असलेल्या दोषांमुळे असू शकते. गॅस्ट्रो इसोफेजिअल रिफ्लक्स- यामध्ये अन्ननलिका व जठर यामध्ये
असलेली झडप पूर्ण बंद होत नसल्याने जठरातील दूध अन्ननलिकेमध्ये येऊन ते थोड्या थोड्या प्रमाणात श्वासनलिकेत जात राहते व त्यामुळे वारंवार न्यूमोनिया होत राहतो. या बाळांमध्ये उलट्यांचे प्रमाण त्याचप्रमाणे रडण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचे उपचार म्हणजे बाळाला झोपताना डोक्याकडील भाग वर करून झोपवणे व घट्ट पदार्थ खायला देणे. काही औषधे देऊन याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. वयानुसार हा त्रास कमी होत जातो. खूप जास्त प्रमाणात दूध वरती येत असेल तर क्वचित बाळाला ऑपरेशनची गरज भासू शकते. बेरियमचा एक्स-रे, मिल्क स्कॅन, पीएच मॉनिटरिंग या तपासण्या केल्या जाऊ शकतात.

अन्ननलिका व श्वासनलिका यांच्याशी संबंधित दुसरा महत्त्वाचा आजार म्हणजे ट्रॅकिओ-इसोफेजिअल फिस्टुला – यामध्ये जन्मतः अन्ननलिका व श्वासनलिका एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात. यामधील 'क ' प्रकारातील फिस्टुलामध्ये अन्ननलिका व श्वासनलिकामध्ये एच सारखे कनेक्शन असते. त्यामुळे बाळाने दूध पिल्यानंतर ते अन्ननलिकेतून श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसात जात राहते व त्यामुळे बाळ लहान असताना सुरुवातीच्या काळात वारंवार न्यूमोनिया होतो. बेरियम स्टडी व ब्रोन्कोस्कोपी या तपासण्या करून याचे निदान होऊ शकते. या आजारांमध्ये ऑपरेशन हाच महत्त्वाचा उपचार आहे. जन्मतः फुफ्फुसांमध्ये किंवा श्वासनलिकेत विकृती किंवा गुंतागुंत असेल तरीही त्यामुळे वारंवार न्यूमोनिया होत राहतो, एक्स रे, सिटी स्कॅन करून याचे निदान होऊ शकते.

 एखाद्या बाळाला श्वास घेताना वेगळा आवाज म्हणजे घरघर असेल तर त्याचे कारण लवचिक स्वरयंत्र, किंवा स्वरयंत्रामधील गाठ किंवा वोकल कोर्ड परालिसीस, लवचिक श्वासनलिका असू शकते. त्यामुळे वारंवार छातीचे आजार होऊ शकतात.

हृदयरोग- काही जन्मजात हृदयरोगांमध्ये हृदयाच्या डाव्या बाजूकडून रक्तप्रवाह उजव्या बाजूस जात असल्यामुळे फुप्फुसामध्ये जास्त रक्तप्रवाह गेल्यामुळे फुप्फुस नाजूक होऊन त्यामध्ये वारंवार जंतुसंसर्ग होऊन न्यूमोनिया होतो. अशावेळी हृदयरोगाची योग्य ट्रिटमेंट करून हा त्रास कमी करता येतो.

फोरेन बोडी- लहान मुलांमध्ये पालकांच्या नकळत, खाताना ठसका लागल्यामुळे खाण्यातील काही पदार्थ (चना, शेंगदाणा) किंवा इतर अन्नाचा तुकडा किंवा खेळताना इतर लहान वस्तू श्वासनलिकेत जाऊ शकते व ही गोष्ट त्यावेळी पालकांच्या लक्षात येत नाही; परंतु नंतर त्या बाळाला वारंवार न्यूमोनिया होऊ लागतो व साधारणतः हा न्यूमोनिया फुप्फुसाच्या एकाच भागात होत राहतो. त्यावेळी अशी शक्यता गृहीत धरून एक्स-रे व फ्लेक्झिबल ब्रोंकोस्कोपी करून त्याचे निदान केले जाऊ शकते, अशी फोरेन बोडी ब्रोंकोस्कोपीच्या साहाय्याने काढून टाकणे हीच त्यांची ट्रिटमेंट आहे.

सिस्टीक फायब्रोसिस- हा फुप्फुसाच्या प्रतिकारशक्ती संबंधित आजार आहे. सिस्टीक फायब्रोसिस हा जन्मजात असणारा आजार आहे. पण, त्याचे निदान मात्र नंतर होत असते. यामध्ये फुफ्फुसातील श्वासनलिकेतील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे तेथे घट्ट असा म्यूकस तयार होतो व तो फुफ्फुसात अडकून राहतो. त्यामुळे छोट्या श्वासनलिका ब्लॉक होतात, त्यामुळे फुफ्फुसाला वारंवार जंतुसंसर्ग होत राहतो व त्यामुळे खोकला, धाप लागणे व ताप ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे बालदम्यासारखी असल्याने सामान्यतः या बाळांना बालदम्याची ट्रिटमेंट दिली जाते; परंतु त्यांना या उपचारांचा जास्त प्रमाणात फायदा होत नाही. या आजारात आतडे व पचनसंस्था यासंबंधीच्या अडचणी होत असतात. सिस्टीक फायब्रोसिसचे निदान करण्यासाठी सिटी स्कॅन, स्वेट (घाम) क्लोराईट टेस्ट व गुणसूत्रांची तपासणी अशा टेस्ट केल्या जातात. एकदा सिस्टीक फायब्रोसिसचे निदान झाल्यास त्याप्रमाणे त्याची योग्य उपचार केले जाऊ शकतात व बाळाचा त्रास कमी होऊ शकतो. जन्मतः स्क्रीनिंग केल्यास सिस्टीक फायब्रोसिसचे निदान लवकर होऊ शकते व त्यामुळे लवकर उपचार चालू होऊ शकतात व त्यामुळे आजार आटोक्यात ठेवणे शक्य होऊ शकते.

प्रायमरी इम्मुनो डेफिसियन्सी- यामध्ये जन्मजात व नैसर्गिकता प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे म्हणजे शरीरात प्रतिकारशक्तीसाठी लागणार्‍या घटकांची कमतरता असल्याने वारंवार जंतुसंसर्ग होत राहतो. यामध्ये त्वचा, कान, फुफ्फुस, अवधाने अशा वेगवेगळ्या ठिकाणी जंतुसंसर्ग होत राहतात व त्यामुळे वारंवार न्यूमोनिया होऊ शकतो. याच्या निदानासाठी इमूनो ग्लोबिनची पातळी तपासून त्यानुसार उपचार करावे लागतात. अशा प्रकारे वारंवार न्यूमोनिया होण्याची अनेक कारणे असू शकतात. याचे योग्य निदान करून त्यानुसार योग्य उपचार करणे गरजेचे आहे व त्यामुळे बाळांना होणारा त्रास कमी करता येऊ शकतो.

  • डॉ. साईनाथ पोवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news