बिहार राज्यातील गया जिल्ह्यात विणकरांचे एक छोटे गाव आहे 'पटवा टोली.' या गावाला 'आयआयटीयन्स'चे गाव असेही एक नाव आहे. या गावाला असे नाव पडण्याचे कारण म्हणजे येथे 110 आयआयटी पदवीधर आहेत. 1992 साली आयआयटी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी मिळवणारे जितेंद्र प्रसाद येथील पहिले आयआयटीयन्स. जितेंद्र प्रसाद यांना परदेशात नोकरी मिळाली. तरीही दरवर्षी ते सुट्टी घेऊन पटवा टोलीमध्ये येतात. त्यांच्या येण्याचा उद्देश असतो, आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन करणे.
जितेंद्र प्रसाद केवळ मार्गदर्शनच करत नाहीत तर अभ्यासाची पुस्तकेे, कोचिंग व अगदी आर्थिक मदतही देतात. त्यांच्या या मदतीमुळे गावातील अनेक विद्यार्थी आयआयटी पदवीधर बनले आहेत. हे नवे पदवीधरही जितेंद्र प्रसाद यांच्या पावलावर पाऊल टाकत नव्या विद्यार्थ्यांना आयआयटीयन्स बनण्यासाठी मदत करत आहेत. पटवा टोली येथे आता 'नव प्रयास' हे स्टडी सर्कलच बनले आहे, जे आयआयटीत प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना सर्वर्ंकष मदत करते. या गावाचे नाव बदलून 'अभियंता विहार' करण्याचाही संकल्प या आयआयटीयन्सनी केला.