समुद्री सर्प | पुढारी

समुद्री सर्पाच्या अनेक उपप्रजाती आहेत. यातील काही प्रजाती बिनविषारी असल्या तरी काही प्रजाती अत्यंत विषारी असतात. काही समुद्री सर्पांचे विष नागाच्या विषाच्या एक हजार  पट तीव्र असल्याचे आढळले आहे. समुद्री सर्प आपले बहुतांश जीवन समुद्रात किंवा जलाशयात व्यतीत करतात. हिंदी महासागर व प्रशांत महासागराच्या उष्णकटिबंधीय भागात समुद्री सर्प आढळतात. समुद्री सर्पाची शेपटी व तोंड छोटे व चपटे असते. यामुळे त्यांना पाण्यात पोहणे सोपे जाते.

मनुष्याला हे सर्प सहसा चावत नाहीत. यांचा स्वभाव लाजाळू असतो. सर्व सरीसृपांप्रमाणे समुद्री सर्पांनाही फुफ्फुसे असतात. श्‍वास घेण्यासाठी त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. फुफ्फुसाचा आकार मोठा असल्याने त्यांना पाण्यात दीर्घकाळ श्‍वास रोखता येतो. काही प्रजातींमध्ये त्वचेद्वारे प्राणवायू ग्रहण करण्याची क्षमता असते.

समुद्री सर्पाच्या शरीराची सरासरी लांबी 4 ते 5 फूट असते. दहा फुटांचे समुद्री सर्पही पाहण्यात आले आहेत. यांच्या शरीराचा रंग काळा, पांढरा, पिवळा, तपकिरी असतो. शरीरावर गोलाकार पट्टे असतात. समुद्री सर्प त्यांची तहान पावसाच्या पाण्यावर भागवतात. पावसाळ्यात समुद्राच्या पृष्ठभागावरच्या पाण्याचा खारटपणा कमी होतो. ते पाणी पिऊन समुद्री सर्प शरीरातील पाण्याची पातळी कायम राखतात.


 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news