आपण आता फ्लॅटमध्ये राहतो. फ्लॅटच्या दरवाजातच कुलूप बसवलेले असते. लॅच कीने ते उघडले की झाले. आता घराच्या दाराची किल्ली सांभाळावी लागते; पण कुलूप हवेच असे नाही. तरीही अनेक घरांच्या बंद दारांवर कुलपे दिसतात. या कुलपाचा शोध कधी आणि कसा लागला, हे पाहूया.
सतराव्या आणि आठराव्या शतकांत युरोपात घराच्या संरक्षणासाठी कुलूप म्हणून जे काही वापरले जात असे, ते अजिबात सुरक्षित नव्हते. चोरांना ते सहज काढता येत असे. थोडी ताकद लावून ते ओढले की, ते निघत असे.
स्वीडनमधील संशोधक ख्रिस्तोफर पॉलहेम याने अतिशय अक्लहुशारीने एक नवे कुलूप 1720 मध्ये तयार केले. पॉलहेम त्याच्या काळातील अतिशय हुशार मेकॅनिकल इंजिनिअर होता. स्वीडनमधील अप्सला विद्यापीठातून त्याने गणित, भौतिकशास्त्र आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास केल्यावर त्याने कुलपे दुरुस्त करण्याचा व्यवसाय सुरू केला; पण हे करत असताना त्याचे प्रयोग सुरू होते. त्याने उद्योगात वापरल्या जाणारी अनेक साधने विकसित केली. त्याचा सर्वात महत्त्वाचा शोध होता तो कुलपाचा. हे कुलूप लोखंडाचे होते आणि त्यात अनेक फिरणार्या डिस्क होत्या. जेव्हा कुलूप बंद केले जाई, तेव्हा कुलपाच्या खाचेत त्या डिस्क अडकून बसत.
योग्य ती किल्ली लावल्याशिवाय त्या डिस्क बाहेर येतच नसत. हे त्या काळातील सर्वात सुरक्षित कुलूप होते. या कुलपाला पॉलहेम कुलूप म्हणून ओळखले जाऊ लागले. पॉलहेमने या कुलपाचे उत्पादन करायला सुरुवात केली. हे कुलूप त्या काळात खूप लोकप्रिय झाले. नंतर त्याच्या डिझाईनमध्ये अमेरिकन कुलूपतज्ज्ञ हॅरी सोरेफ याने बदल करून मास्टर लॉक कंपनीची स्थापना केली.
1921 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत तयार झालेल्या सुधारित डिझाईनची कुलपे आजही वापरली जातात.