बाल वीर
19 जुलै 2017 केरळातील अलापुझ्झा येथील लिओ सेकंडरी हायस्कूलमध्ये शिकणारे सेबास्टिअन विन्सेंट व अभिजित हे दोन मित्र सायकलवरून शाळेत जात होते. अचानक त्यांची सायकल रेल्वेमार्गावरच खाली पडली. सायकल चालविणार्या अभिजितच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला उठताही येईना. त्या रेल्वेमार्गावरून एक वेगवान एक्स्प्रेस त्याचवेळी येत होती. अभिजितप्रमाणेच जखमी झालेल्या सेबास्टिअनच्या लक्षात आले की अभिजितला रेल्वेमार्गावरून बाजूला काढले नाही तर तो रेल्वेखाली येणार.
सेबास्टिअनने स्वत: जखमी असूनही अभिजितला त्या रेल्वेमार्गावरून बाजूला ढकलण्याची पराकाष्ठा केली. रेल्वे अगदी जवळ आलेली असताना त्याने अभिजितला रेल्वेमार्गावरून बाजूला ढकलले. सेबास्टिअनने जीवाची पर्वा न करता आपल्या मित्राला मृत्यूच्या दारातून परत आणले. या त्याच्या साहसासाठी त्याची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली. 13 वर्षीय या बालवीराच्या साहसाची दखल केरळ राज्य सरकारनेही घेतली असून त्याच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च केरळ सरकार उचलणार आहे.