अमनला स्वर्ग व नरक पाहण्याची तीव्र इच्छा होती. मेल्याशिवाय हे कसे शक्य होणार? एके दिवशी अमन मरण पावला. तो स्वर्ग आणि नरकाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला. तेथे एक देवदूत त्याची वाटच पाहत होता. आयुष्यभर स्वर्ग व नरकाविषयी केवळ कल्पना करणार्या अमनला राहवले नाही. त्याने देवदूताला हात जोडून विनंती केली, "मला स्वर्गात न्या किंवा नरकात टाका; पण स्वर्ग व नरकाचे दर्शन आधी घडवा."
देवदूताने त्याची विनंती मान्य केली. त्याने अमनच्या हाताला धरून नरकात नेले. नरक अमनच्या कल्पनेपेक्षा वेगळा होता. तेथे एक प्रशस्त व लांबलचक मेज होते. मेजावर उत्तमोत्तम पक्वान्ने सजवून ठेवली होती. मेजाच्या सभोवताली लोक बसले होते. लोकांच्या डोक्यावर एक फलक होता. त्या फलकावर सूचना होती. 'अन्न केवळ मेजावरच्या चमचे व काट्यांद्वारे खायचे. अन्नाला हाताचा स्पर्श अजिबात करायचा नाही.'
चमचे व काटे एवढे मोठे होते की त्यांच्याद्वारे अन्नग्रहण करणे शक्यच नव्हते. तोंडाजवळ नेण्याअगोदरच अन्न खाली सांडायचे. त्यामुळे मेजाभोवती बसलेले लोक उपाशी व दु:खी दिसत होते.
"हा नरक आहे." देवदूत अमनला म्हणाला, "आता तुला स्वर्ग दाखवतो." देवदूत अमनला घेऊन स्वर्गात गेला. तेथे सर्व काही नरकासारखेच होते. लांबलचक व प्रशस्त मेज… उंची पक्वान्ने… आजूबाजूला बसलेले लोक… लांबलचक काटे व चमचे. तरीही लोक आनंदी व तृप्त दिसत होते. कारण लांबलचक काट्या-चमच्यांचा वापर लोक स्वत:च्या भोजनासाठी करत नव्हते, तर दुसर्यांना अन्न भरवण्यासाठी करत होते. त्यामुळे सर्वांना भरपेट अन्न मिळत होते. कोणी उपाशी व दु:खी नव्हते."हा स्वर्ग आहे." देवदूत म्हणाला.खरं म्हणजे देवदूताने सांगण्याची गरज नव्हती. अमनला स्वर्ग म्हणजे काय व नरक म्हणजे काय याची पुरती जाणीव झाली.