हत्ती हा जमिनीवर राहणारा जगातील सर्वात मोठा प्राणी समजला जातो. हत्तीचे वजन 150 माणसांएवढे असते. हत्तींमध्ये आफ्रिकी आणि आशियाई असे दोन प्रकार आढळून येतात.
आफ्रिकेतील हत्ती हे नेहमी कळपानेच राहतात. तेथील हत्तींच्या कळपांना ‘हर्ड’ असे म्हणतात; मात्र फक्त मादी आणि लहान हत्ती कळपाने राहतात. नर हत्ती स्वतंत्रपणे राहतात. हत्तीच्या कुटुंबात आठ ते दहा जणांचा समावेश असतो. हत्तींना लांबलचक आणि धारधार सुळे असतात. हत्तींच्या प्रचंड आकारांच्या कानांचे माणसाला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहेत.
सुपासारख्या आकारांच्या कानांचा वापर करत हत्ती प्रखर उष्णतेत स्वतःचे शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात. आफ्रिकेत कळपात राहणारे छोटे हत्ती एकमेकांशी खेळताना पाहाणे हा वेगळाच अनुभव असतो. एकमेकांशी खेळूनच हत्तींची पिले वाढत असतात. एकमेकांच्या पाठीमागे धावणे, एकमेकांच्या अंगावर लाकूड, झाडांच्या फांद्या टाकणे आणि एकमेकांच्या अंगाखांद्यावर चढणे अशा पद्धतीने हत्तींची पिले खेळत असतात. हत्तींच्या नाकाला सोंड असे म्हणतात. या सोंडेचा आकार अवाढव्य असतो.
या सोंडेद्वारे वास घेऊन हत्ती आपली अनेक कामे करत असतो. त्याखेरीज खाणे, पाणी पिणे ही कामेही हत्ती सोंडेद्वारेच करत असतो. स्वतःचे शरीर स्वच्छ करण्यासाठी हत्ती सोंडेचाच वापर करतात. अनेकदा हत्ती आपल्या लांबलचक सोंडेचा वापर करून उंच झाडांची पाने, फुले सुद्धा खात असतात. आशियात आढळून येणार्या हत्तींपेक्षा आफ्रिकेतील हत्तींचा आकार खूपच मोठा असतो. एकमेकांना हाक मारण्यासाठी हत्ती मोठा आवाज करतात. आपल्यावर एखादी व्यक्ती किंवा प्राणी चालून येतो आहे, असे दिसल्यावर त्या प्राण्याला घाबरवण्याकरिता हत्ती आपली सोंड हलवतात. तसेच तोंडातून मोठा आवाजही काढतात. हत्तीची त्वचा अत्यंत संवेदनशील समजली जाते.
आपल्या त्वचेवर कीडे, कीटक बसू नये याकरिता हत्तीला आपली त्वचा वारंवार साफ करावी लागते. याकरिताच हत्ती आपल्या सोंडेत पाणी घेऊन हे पाणी संपूर्ण शरीरावर टाकण्याचे काम करत असतात.