कथा : घरातील भाऊगर्दी | पुढारी

Published on
Updated on

कोणे एकेकाळी एक शेतकरी त्याच्या कुटुंबासमवेत एका गावात राहत होता. त्याचे कुटुंब भलेथोरले होते. शेतकर्‍याची वृद्ध आई, त्याची पत्नी व सात मुले असा मोठा परिवार एका खोलीच्या घरात राहत होता. मोठ्या कुटुंबामुळे घरात सतत भांडणे होत. यामुळे शेतकर्‍याने एका पंडिताचा सल्ला घ्यायचे ठरवले.

 'घर न बदलता माझ्या कुटुंबात होणारी भांडणे सोडवण्यासाठी एखादा उपाय सांगा, पंडितजी!' शेतकरी काकुळतीने म्हणाला. पंडिताने थोडावेळ विचार करून प्रश्न केला, 'तुझ्याकडे कोंबड्या आहेत?' 'होय, पंडितजी.' शेतकर्‍याने उत्तर दिले.

'तुझ्याकडच्या सर्व कोंबड्या घरात ठेवत जा.' पंडिताने सल्ला दिला. शेतकर्‍याने तसे केले. तिसर्‍या दिवशी शेतकर्‍याने पंडिताच्या घरचा दरवाजा ठोठावला. शेतकरी पंडिताला म्हणाला,

'घरात कोंबड्यांनी उच्छाद मांडला आहे. घरातील सर्व जण त्यांच्यामुळे कातावले आहेत.'  'तुझ्याकडे बकर्‍या तर असतीलच ना?' पंडिताने शेतकर्‍याच्या तक्रारीकडे कानाडोळा करत विचारले.'होय तर, दोन बकर्‍या आहेत.' शेतकरी म्हणाला.

'मग त्यांनाही कोंबड्यांसमवेत घरात ठेव.' पंडिताने आणखी एक रामबाण उपाय सांगितला. शेतकर्‍याने पंडिताचा हा सल्लाही मानला. आणखी काही दिवसांनंतर हवालदिल झालेला शेतकरी पुन्हा पंडिताकडे आला. तो म्हणाला,

'पंडितजी, तुमचा हा उपाय तर आजारापेक्षा भयंकर निघाला. कोंबड्या-बकर्‍यांमुळे घरात राहणे अशक्य बनले आहे. त्यांच्यामुळे वेड लागण्याची पाळी आली आहे. काय करावे ते समजत नाही.'

'काही चिंता करू नकोस. घरात ज्या कोंबड्या व बकर्‍या ठेवल्या आहेस, त्यांना पुन्हा घराबाहेर ठेव.' पंडिताने शेवटचा सल्ला दिला. 

शेतकरी लगोलग घरी पळाला व त्याने सर्व कोंबड्या-बकर्‍यांना घराबाहेर काढले. एका आठवड्यानंतर शेतकरी हसत हसत पंडिताकडे आला. त्याच्या चेहर्‍यावरील हास्यच त्याची चिंता मिटल्याचे दर्शवत होते. तो पंडिताला म्हणाला, 'कोंबड्या-बकर्‍या घराबाहेर गेल्याने घरात शांती नांदत आहे. सगळेजण कसे आनंदी आहेत. घर तर आता पूर्वीपेक्षा मोठे वाटत आहे. पंडितजी, तुमचे कसे आभार मानू? तुम्ही तर माझी समस्या चुटकीसारखी सोडवली!'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news