आय. एन. एस. कडलोर हे भारतीय नौदलातील जहाज 2018 च्या मार्च महिन्यात सेवेतून मुक्त करण्यात आले. पुदूचेरी सरकार तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, नॅशनल सेंटर फोर ओशन रिसर्च व पाँडीकॅन या संस्थांच्या मदतीने या जहाजाला देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात बदलण्यात येणार आहे. 60 मीटर्स लांब, 12 मीटर्स रुंदीचे हे जहाज पुदूचेरीच्या सागर किनार्यापासून 7 कि. मी. अंतर दूर समुद्र तळावर असेल. कालांतराने येथे समुद्री शैवाल, वनस्पती नैसर्गिकरितीने उगवतील व मासे व इतर जलचरांचा एक पर्यावरण अधिवास तयार होईल. स्कुबा डायव्हिंगद्वारे पर्यटकांना या समुद्राखालील संग्रहालयात जाता येईल. जहाजाची शिडे पाण्याबाहेर ठेवण्यात येतील, जेणेकरून पर्यटकांना अचूकरितीने या संग्रहालयाकडे जाता येईल.
जगात अशी पाण्याखालील संग्रहालये मोजकीच आहेत. त्यात इटलीतील बैया अंडरवॉटर पार्क, इस्राईलमधील हेरॉडस् हार्बर, मुसा बेटावरील म्युझिओ आर्टे, कॅनरी बेटावरील म्युझिओ लांझारोटे व फ्लोरिडा येथील शिपव्रेक ट्रेल यांचा समावेश आहे. भारतातील पुदूचेरी संग्रहालय एकमेव पाण्याखालील संग्रहालय असेल.