राष्ट्र सेवा दल या लोकशाही समाजवादी संघटनेची स्थापना 1941 सालच्या जून महिन्यात साने गुरुजी, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरुभाऊ लिमये व इतर काही समाजवादी विचारसरणीच्या समाजधुरीणांनी केली. युवकांमध्ये राष्ट्रचेतना निर्माण करणे, जात-धर्म विरहित पुरोगामी समाजाची जडणघडण करणे ही या संघटनेची मुख्य उद्दिष्टे होती. राष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता व विज्ञानभिमुखता या पंचसूत्रीवर काम करणारे राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते स्वातंत्र्य चळवळीत अतिशय जोमाने उतरले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यामुळे ही चळवळ टिकून राहिली. श्रमदान शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे राष्ट्र सेवा दलाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मधू लिमये, पन्नालाल सुराणा, मधू दंडवते, भाऊसाहेब थोरात, मृणाल गोरे, वसंत बापट, यदुनाथ थत्ते, सदानंद वर्दे, चंद्रशेखर धर्माधिकारी, मेधा पाटकर, श्रीराम लागू, निळू फुले असे दिग्गज व नामवंत लोक या संघटनेशी जोडलेले होते. गणेश देवी या ज्येष्ठ विचारवंतांची निवड नुकतीच राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.