जगात अनेक प्राणी व पक्षी प्रजाती नष्टप्राय होण्याच्या स्थितीत आहेत. नैसर्गिक अधिवासाचा खातमा, मानवी तस्करांकडून होणारी शिकार व बदलते पर्यावरण यामुळे अनेक प्राणी व पक्षी प्रजाती शेवटच्या घटका मोजत आहेत. या प्राणी-पक्ष्यांच्या प्रजातींना नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी दोन लहान मुले प्रयत्न करत आहेत. साई राहुल राजू व साई रोहन राजू ही दोन भांवडे त्यांच्या चित्रकलेच्या कौशल्याच्या माध्यमातून हे कार्य करत आहेत. आफ्रिकन काळा गेंडा, ध्रुवीय अस्वल, बंगालमधील वाघ या प्राण्यांसोबत अनेक सागरी जलचर व पक्षी कसे नष्ट होत आहेत याबाबत राहुल व रोहन चित्रांची प्रदर्शने भरवून माहिती देतात. प्रजाती नष्ट होण्याची कारणे, त्यावर केले जाणारे उपाय व सामान्य नागरिकांचे योगदान याबाबत ते चित्रांच्या माध्यमातून माहिती देतात. त्यांचा हा उपक्रम शब्दबंबाळ लेखांपेक्षा अधिक परिणामकारक ठरतो.
केवळ प्रजाती संरक्षण नाही, तर घनकचर्याचे रिसायकलिंग व स्वच्छता यावरही त्यांनी प्रदर्शने भरवली आहेत. या दोन भावांना डायना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.