तेरा वर्षांचा राकेश पटेल एक अनाथ मुलगा आहे. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील रिवावारी गावात राहणारा राकेश 14 जून 2015 रोजी त्याच्या गावातील एका विहिरीजवळ बसला होता. ती विहीर सुमारे वीस फूट खोल होती. अचानक राकेशला काही लोकांचा गलबला ऐकू आला. सहा वर्षांचा दिनेश नावाचा मुलगा अचानक विहिरीत पडून बुडू लागला होता. राकेशने लगेच त्या विहिरीत उडी मारली व बुडत असलेल्या दिनेशला प्रथम वर काढले. विहिरीजवळ जमलेल्या लोकांनी लगेच त्या दोघांना दोराच्या साहाय्याने वर काढले. राकेश लहानपणीच पोहायला शिकला होता. विहीर शेवाळ व जलचरांनी भरलेली असूनही राकेशच्या पोहोण्याच्या कौशल्यामुळे दिनेशचे प्राण वाचले.
राकेश पटेलच्या शौर्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा 'बापू गायधनी शौर्य पुरस्कार' देऊन सन्मान केला. 26 जानेवारी 2016 रोजी मान्यवर लोकांच्या उपस्थितीत राकेश पटेलने हा सन्मान स्वीकारला.