जेम्स वॅट याने वाफेच्या इंजिनात क्रांतिकारी सुधारणा केली, तरी त्याने या इंजिनाची प्रेरणा थॉमस सेव्हरी या ब्रिटिश अभियंत्याच्या वाफेच्या इंजिनापासून घेतली. थॉमस सेव्हरीचा जन्म 1650 साली इंग्लंडमध्ये झाला. पेशाने अभियंता असलेला सेव्हरी कोळशाच्या खाणीत जमा होणार्या पाण्याचा उपसा करणार्या यंत्राची निर्मिती करण्याच्या प्रयत्नात होता. कोळशाच्या खाणीत जमा होणारे पाणी कामगारांसाठी धोकादायक होते व ते कामगारांना हाताने उपसून काढावे लागे. सेव्हरीने फ्रेंच शास्त्रज्ञ डेनिस पेपिन याच्या मदतीने वाफेच्या दाबाचा वापर करून खाणीतून पाणी बाहेर काढणारे यंत्र बनवले. हे यंत्र कोळशाच्या खाणीतून पाणी काढण्यात यशस्वी झाले. उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांवर पाणी या यंत्राद्वारे पोहोचवता येऊ लागले. मात्र अति उच्चदाबाच्या वाफेची समस्या या यंत्रात होती. सॅव्हेरीने थॉमस न्यूकोमच्या मदतीने ही समस्या दूर केली. वातावरणाच्या दाबावर चालणारे पिस्टन इंजिन बसवल्याने वाफेच्या या पहिल्यावहिल्या इंजिनाची कार्यक्षमता वाढली. पुढे जेम्स वॅटकडे जेव्हा सॅव्हेरी-न्यूकोमचे यंत्र दुरुस्तीसाठी आले तेव्हा या इंजिनात वाफेची बरीचशी शक्ती वाया जाते हे त्यांच्या लक्षात आले. जेम्स वॅटने या वाफेच्या इंजिनात सुधारणा करून एवढे कार्यक्षम बनले की जेम्स वॅटलाच 'आधुनिक वाफेच्या इंजिनाचा जनक' म्हटले जाऊ लागले.