इमारत की जंगल? | पुढारी | पुढारी

इमारत की जंगल? | पुढारी

इमारती म्हणजे क्राँकीटचे जंगल, अशी आपली समजूत असते. इटलीतील मिलान शहरातील ‘बॉस्को व्हर्टिकल’ इमारत पाहून मात्र तुमचे हे मत बदलेल. याचे कारण ही फक्‍त इमारत नाही, तर झाडे-झुडपांनी सजलेले जंगलच आहे. बॉस्को व्हर्टिकल ही 111 मीटर्स उंचीच्या दोन टॉवर्सने बनलेली रहिवाशी इमारत आहे. या इमारतीच्या पायापासून छतापर्यंत 900 झाडे, 5000 झुडपे व 11000 रोपे लावण्यात आली आहेत. काच व सिमेंटचा वापर करून इमारत बनवण्यात आली असली, तरी शक्य तेथे थंडावा देणारे वृक्ष व रोपे लावण्यात आली आहेत. वृक्षांची लागवड करताना अतिशय काळजी घेण्यात आली आहे. शहरी वातावरणात वाढू शकतील असे वृक्ष उदा. यलो अकेशिया, मेपल ओक, अ‍ॅश ट्री, फर्न, इव्ही इत्यादी झाडे येथे लावण्यात आली आहेत. या वृक्षराजीमुळे इमारतीच्या सदनिकांमध्ये थंडावा राहतो. धूळ व अन्य वायू प्रदूषणापासून इमारतीचे संरक्षण होते. ही इमारत झाडांमुळे दिसायलाही आकर्षक दिसते.

Back to top button