कथा : अप्रामाणिक मित्र | पुढारी | पुढारी

कथा : अप्रामाणिक मित्र | पुढारी

मुस्तफा हा दमास्कस शहरातील एक नामवंत व्यापारी होता. त्याच्या एकुलत्या एका मुलाचे नाव सय्यद होते. व्यापारातील बारकावे मुलाने शिकावे, अशी मुस्तफाची इच्छा होती. शेवटी त्याच्यानंतर मुलाकडेच व्यवसायाची जबाबदारी येणार होती. सय्यदचा अब्दुल नावाचा एक अतिशय लबाड मित्र होता. पण सय्यदचा त्याच्या या मित्रावर अंमळ जास्तच विश्वास होता. अब्दुलच्या धूर्त स्वभावाबद्दल मुलाला कसे सावध करावे, हा मुस्तफासमोर मोठा प्रश्न होता.

एकदा मुस्तफा व त्याच्या मुलाला व्यापारानिमित्त एक आठवडा शहराबाहेर जावे लागणार होते. मुस्तफाच्या घरात अनेक मौल्यवान वस्तू होत्या. त्या घरात तशाच सोडून जाणे त्याच्या जीवावर आले. त्याला एखादा भरवशाचा माणूस हवा होता, जो त्या वस्तू सांभाळून ठेवेल.

‘मला वाटतं, माझा मित्र अब्दुल या कामासाठी अगदी योग्य व्यक्ती आहे. आपण परत येईपर्यंत अब्दुलच्या घरी आपल्या मौल्यवान वस्तू ठेवू.’ सय्यदने वडिलांना सुचवले. मुस्तफाही या गोष्टीस कबूल झाला. त्याने लोखंडाची एक जड पेटी सय्यदच्या हाती सुपूर्द केली. त्या पेटीला दोन भलीमोठी कुलुपे होती. सय्यदने अब्दुलकडे ती पेटी दिली. आठवड्यानंतर मुस्तफा व त्याचा मुलगा सय्यद शहरात परत आले. मुस्तफाने मुलाला पेटी परत आणण्यासाठी अब्दुलकडे पाठवले. काही वेळानंतर सय्यद मित्राच्या घरून परत आला. तो प्रचंड संतापलेला होता. मोठ्याने ओरडत तो म्हणाला, ‘बाबा, तुम्ही माझ्या मित्राचा प्रचंड अपमान केला आहे. तो म्हणतो पेटीत मौल्यवान वस्तू नव्हत्या, तर चक्क दगड होते. हाच विश्वास ठेवला तुम्ही माझ्या मित्रावर? मला तर त्याला तोंड दाखवायला जागा उरली नाही.’

मुस्तफाने एकवार मुलाकडे पाहिले व म्हणाला,

संबंधित बातम्या

‘लाज तुला नाही तर तुझ्या मित्राला वाटली पाहिजे. पेटीची कुलुपे खोलल्याशिवाय त्याला कसे कळले की पेटीत दगड आहेत? जर तो एवढा प्रामाणिक आहे तर कुलुपे उघडण्याची गरज त्याला का भासली? अशा अप्रामाणिक माणसावर विश्वास ठेवण्याएवढा मूर्ख तू असलास तरी मी नाही!’

Back to top button