भारतदर्शन : जल जीवन मिशन | पुढारी

भारतदर्शन : जल जीवन मिशन

जल शुद्धीकरण यंत्रे खरेदी करण्याची गरज मुंबईकरांना तरी निश्चित नाही. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् या संस्थेने देशाच्या एकवीस मुख्य शहरांत केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई महानगरपालिकेद्वारे पुरवण्यात येणारे पिण्याचे पाणी देशातील सर्वात स्वच्छ पाणी आहे. या उलट राजधानी दिल्लीतील पिण्याचे पाणी सर्वात अशुद्ध आहे. ‘जल जीवन मिशन’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. 2024 पर्यंत देशात सर्वत्र स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

कोलकाता, चेन्नईसारखी महानगरेही स्वच्छ पाण्याच्या बाबतीत फार मागे आहेत. पाण्याचा रंग, स्वाद, जडपणा, त्यातील रासायनिक तत्त्वे, खनिजे-धातूंचे प्रमाण, जीवाणू-विषाणूंचे प्रमाण, सूक्ष्म कणांचे प्रमाण, पाण्याचे क्षारत्व आणि विद्युत वाहकता या विविध गुणधर्मांचा अभ्यास करून पाणी किती स्वच्छ आहे, ते ठरवले जाते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्ने पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अकरा मानके (स्टडर्डस्) निश्चित केली आहेत. केवळ मुंबई शहर अकरा मानकांवर खरे उतरले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भुवनेश्वर, हैद्राबाद, रायपूर, रांची, डेहराडून या छोट्या शहरांतील पाणी स्वच्छ आहे.

संबंधित बातम्या
Back to top button