एका दिवसाचा पंडित | पुढारी

कोणे एकेकाळी वाराणसी शहरात राजनाथ नावाचा प्रसिद्ध पंडित राहत होता. त्याच्या पांडित्याची महती त्याच्याच राज्यात नाही, तर शेजारच्या राज्यांतही गायली जात असे. तो जेथे जाई तेथे लोक त्याचा सन्मान करत. राजा असो वा सामान्य प्रजा, त्याच्या ज्ञानासमोर सर्व नतमस्तक होत असत. अनेक विद्वान त्याचा सल्ला घेण्यासाठी येत असत. पंडित राजनाथचा सोमू नावाचा गाडीवान होता. मालकाच्या प्रसिद्धीबद्दल सोमूला अभिमान वाटे व असूयाही. त्यालाही मालकाप्रमाणे लोकांच्या आदराला पात्र बनावे असे वाटे. एकदा तो पंडित राजनाथला म्हणाला,
“मालक, तुमच्याप्रमाणे मला यशस्वी व प्रसिद्ध बनायचं आहे. फक्त एका दिवसासाठी तुम्ही माझी जागा घ्याल का? मी पंडित राजनाथ बनेन व तुम्ही माझे गाडीवान सोमू बना.”
गाडीवानाची ही विचित्र विनंती ऐकून राजनाथ थोडा चकित झाला. तो केवळ विद्धानच नव्हता, तर उमद्या मनाचा होता. तो सोमूला म्हणाला,
“तुझ्या या योजनेला माझी काही हरकत नाही. तरीही एक समस्या आहे. तुला लिहिता-वाचता येत नाही. एखाद्याने वेद-पुराणातील एखादी समस्या विचारली, तर तू त्याला काय उत्तर देणार? तुझ्या नाहीतर माझ्या नावाला बट्टा लागेल.”
“मी कसे तरी सांभाळून घेईन. केवळ एका दिवसाचा प्रश्न आहे मालक.”
सोमू अजिजीने म्हणाला. राजनाथनेही त्याचे म्हणणे मान्य केले. एका शास्त्रार्थाच्या सभेसाठी जेव्हा राजनाथला बोलावणे आले तेव्हा सोमूने पंडिताचा पोशाख चढवला व राजनाथ त्याचा गाडीवान सोमू बनला. शास्त्रार्थांच्या सभेत पंडित बनलेल्या सोमूचे जोरदार स्वागत करण्यात आले. खरा राजनाथ दुरून हे पाहत मनाशी हसत होता. सभेत एक विद्वान सोमूकडे आला व त्याला एका ग्रंथातील श्लोक दाखवत म्हणाला,
“पंडितजी, अनेक घटका अभ्यास करूनही या श्लोकाचा अर्थ मला उमगत नाही.”
सोमूने उतारा बारकाईने वाचण्याचे नाटक केले व राग आल्याचा आव आणत तो म्हणाला,
“या एवढ्या साध्या श्लोकाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी माझ्यासारख्या पंडिताची काय गरज? या श्लोकाचा अर्थ माझा गाडीवानही समजावून सांगेल.”
असे म्हणून त्याने गाडीवान बनलेल्या राजनाथला श्लोकाचा अर्थ सांगण्याची आज्ञा केली. राजनाथनेही श्लोकाचा अर्थ लगेच सांगितला. तेथे जमलेले सर्व लोकचकित झाले. वाराणसीचा पंडित राजनाथच नाहीतर त्याचा गाडीवानही वेदशास्त्राच्या अभ्यासात पारंगत आहे, हे पाहून लोकांनी तोंडात बोटे घातली.