उकारी | पुढारी | पुढारी

उकारी | पुढारी

दक्षिण अमेरिकेतील उकारी वानराला दुरूनही चटकन ओळखता येते. याचे कारण या वानराच्या डोक्यावर अतिशय विरळ केस असतात व त्याचा चेहरा लालजर्द असतो. याच्या शरीराची लांबी 40 ते 45 सेंमी असते. याला लांबलचक शेपूट लाभलेली नाही. एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जाण्यासाठी हा आपल्या हातापायांचाच वापर करतो. उकारी वानराच्या कळपात एकावेळेस शंभरहून अधिक वानरे असू शकतात. याच्या आहारात फळांचा जास्त प्रमाणात समावेश असला तरी भाज्या व कीटकही हा वानर खातो. हा प्राणी लाजाळू असल्याने याला जंगलात शोधणे कठीण असते. ब्राझील, कोलंबिया, पेरू व व्हेनेझ्युएला या देशांत हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. अ‍ॅमेझॉन नदी व तिच्या उपनद्यांच्या आसपासची जंगले हे या प्राण्याचे नैसर्गिक अधिवास क्षेत्र आहे. याच्या एकूण चार उपप्रजाती आहेत. लाल चेहर्‍याच्या उकारीची प्रजाती अ‍ॅमेझॉन नदीच्या उत्तरेला आढळते. काळा चेहरा असलेला उकारी अ‍ॅमेझॉनची उपनदी रिओ निग्रोच्या दक्षिणेला आढळतो. नेबलिना व अराका उकारी अ‍ॅमेझॉनच्या खोर्‍यात आढळतात. नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने या प्राण्याला अस्तंगत होण्याचा धोका असलेल्या प्राण्यांच्या यादीत वरचे स्थान देण्यात आले आहे.

Back to top button