अजब-गजब : २,६०० वर्षांपूर्वीचा मेंदू | पुढारी

अजब-गजब : २,६०० वर्षांपूर्वीचा मेंदू

मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात मृदू अवयव आहे. माणसाच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच मेंदू नष्ट होत असल्याने मेंदूचे जीवाश्म सापडणे अशक्यप्राय गोष्ट मानली जाते. इंग्लंडच्या हेस्लिंग्टन गावात खोदकाम करताना शास्त्रज्ञांना सुमारे 2,600 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीचा सांगाडा सापडला. त्या व्यक्तीच्या कवटीतील मेंदू जशाचा तसा होता. रेडिओकार्बन डेटिंगनुसार त्या व्यक्तीचा मृत्यू ख्रिस्तपूर्व 673 ते 482 या कालावधीदरम्यान झाला होता.

सांगाड्याच्या अभ्यासावरून असेही आढळून आले की त्या व्यक्तीचा फाशी, शिरच्छेद किंवा खून असा हिंसक मृत्यू झाला असावा. शरीरातील काही आम्ल पदार्थांमुळे मेंदूची नैसर्गिक क्षती रोखली गेल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एखाद्या आजारामुळेही मेंदूभोवतीच्या प्रथिनांच्या आवरणात बदल होऊ शकतो. अशा परिस्थितीत मेंदू सडण्याची प्रक्रिया एकतर मंदावू शकते किंवा पूर्ण थांबू शकते, असेही शास्त्रज्ञ म्हणतात. 2,600 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतरही हेस्लिंग्टन गावातील या माणसाचा मेंदू सुस्थितीत राहिला ही मात्र वस्तुस्थिती आहे. शेकडो वर्षांनंतरही मेंदू सुस्थितीत हे एकमेव उदाहरण नाही. स्विडनमध्ये सुमारे 8,000 वर्षांपूर्वी पाण्यात दफन केल्या गेलेल्या एका व्यक्तीचा मेंदूही असाच चांगल्या स्थितीत आढळला होता.

संबंधित बातम्या
Back to top button