अग्निबाण | पुढारी | पुढारी

अग्निबाण | पुढारी

मंगोल सैनिक ज्या दोन चिनी अस्त्रांना घाबरत त्यापैकी एक होते अग्निबाण. रॉकेटचा शोध लागण्याच्या  शेकडो वर्षांपूर्वी चिनी लोकांनी अग्निबाणाचा शोध लावला होता. नवव्या शतकाच्या आसपास चिन्यांनी बंदुकीच्या दारूचा वापर करून अग्निबाण बनवण्यास प्रारंभ केला. या बाणांना ते ‘हुओजिआन’ म्हणत. हवेतून मारा करता येईल अशा अग्निशस्त्रांचा हुओजिआन पूर्वज म्हणावा लागेल.

यात बाणाच्या टोकाच्या मागे बंदुकीची दारू पातळ कागदाच्या आवरणात लपेटून बांधली जात असे. केवळ वात बाहेर ठेवून त्यावर कापडाचे आवरण चढवून रोगणाने स्फोटक द्रव्य सीलबंद केले जात असे. बाण धनुष्यावर किंवा क्रॉसबोवर चढवून वात पेटवत. बाण लक्ष्यावर आदळल्यावर स्फोट होऊन आग लागत असे. अग्निबाणाचा वापर चिनी, मंगोल व जपानी सैनिकांनी अनेक युद्धांत केला.

जपानी सागरी चाच्यांनीही या शस्त्रांचा वापर केल्याची नोंद आहे. युरोपातही नंतर या शस्त्राचा वापर होऊ लागला. आजची आधुनिक क्षेपणास्रे या अग्निबाणाच्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. फरक एवढाच की, प्राचीन अग्निबाणामुळे थोड्या प्रमाणात नुकसान व्हायचे, तर आधुनिक क्षेपणास्र एखाद्या शहराचा अख्खा ब्लॉक उद्ध्वस्त करू शकते.

संबंधित बातम्या

Back to top button