अजब-गजब : गुहेतील राक्षस | पुढारी | पुढारी

अजब-गजब : गुहेतील राक्षस | पुढारी

सुमारे चार वर्षांपूर्वी म्हणजे 2016 साली पुराणवस्तू शास्त्रज्ञांना इराकच्या एका गुहेत 2,700 वर्षांपूर्वीची मृदावडी म्हणजे क्ले टॅब्लेट सापडली. त्याकाळच्या असिरियन संस्कृतीत लिहिण्यासाठी पाटी किंवा वही नव्हती. अशा मातीच्या ओल्या वडीवर लिहून मग ती सुकवली जायची. त्या पुरातन वडीवर एका बेन्नू या राक्षसाचे चित्र होते. बेन्नू राक्षसाचे डोके, पाय व शेपटी हे अवयव बकर्‍याचे होते. त्याची जीभ म्हणजे तोंडातून बाहेर येणारा साप होता. त्याकाळी माणसांना एक विचित्र रोग व्हायचा. या रोगात माणसाला झटके यायचे. माणूस बकर्‍यासारखा ओरडायला लागायचा. लोकांचा गैरसमज व्हायचा, की माणसाच्या शरीरात बकर्‍याच्या स्वरूपातील राक्षस शिरला आहे. या बकरारूपी राक्षसाला त्यांनी नाव दिले बेन्नू. याच बेन्नूचे एक चित्र या वडीवर काढलेले होते. प्रत्यक्षात कोणत्याही राक्षसामुळे किंवा सैतानामुळे हा रोग व्हायचा नाही. हा रोग फेफर्‍याप्रमाणे एक मेंदूचा विकार होता. आजच्या आधुनिक भाषेत या रोगाला बेन्नू एपिलेप्सी हे नाव आहे. आज हा रोग सहसा कुणाला होत नाही. असिरियन संस्कृतीतील लोकांना वाटायचे, की हा रोग राक्षसामुळे होतो. त्यांच्या कल्पनेतील राक्षसाला त्यांनी मृदावडीवर चितारले व तो काल्पनिक राक्षस 2,700 वर्षांनंतर इराकमधील गुहेत सापडला.

Back to top button