अद्भुत प्राणी : एक्स रे टेट्रा | पुढारी

अद्भुत प्राणी : एक्स रे टेट्रा

‘एक्स रे टेट्रा’ या माशाचे नाव गोल्डन टेट्रा किंवा वॉटर गोल्ड फिंच आहे. याच्या नावात ‘एक्स रे’ शब्द लागण्याचे कारण म्हणजे या माशाची त्वचा एवढी पारदर्शक असते की, तिच्यातून माशाचा कणा स्पष्ट दिसतो. या माशाचा रंग चंदेरी व सोनेरी असतो. हा मासा स्वच्छ जलाशयात राहणे पसंत करतो. पाण्याच्या प्रदूषणाचा या माशाच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो. एक्स रे टेट्राची मादी एकावेळेस 300 ते 400 अंडी देते. 24 तासानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात व काही दिवसांच्या आत स्वतंत्रपणे पोहू लागतात. पारदर्शक त्वचेमुळे या माशाचे परभक्षींपासून काही प्रमाणात संरक्षणही होते. 

नितळ पाण्यात या माशाला शोधणे परभक्षींना कठीण जाते. अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन नदीमध्ये हा मासा आढळतो. ब्राझील, गयाना व व्हेनेझ्युएला देशांतील काही नद्यांमध्येही हा मासा आढळतो. याच्या चमकदार चंदेरी व सोनेरी रंगामुळे या माशाला मत्स्यालयात ठेवले जाते. हा आकाराने छोटा मासा आहे. याची लांबी 3 ते 5 सें.मी. असते. कीटक व छोटे कवचधारी जलचर याचा आहार आहे. मोठे मासे, पक्षी व बेडूक यांच्याकडून याची शिकार केली जाते. हा मासा वाढत्या जल प्रदूषणामुळे अस्तंगत होण्याच्या काठावर आहे.

संबंधित बातम्या
Back to top button