

एकेकाळी वारी ही वैयक्तिक कुलाचार मानली जायची. ज्ञानोबा माऊलीचे पिता विठ्ठलपंत, तुकोबारायांचे पूर्वज विश्वंभर नाथ बाबा, वडील बोल्होबा आंबिले (मोरे) यांनी वैयक्तिक कुलाचार म्हणून ‘वारी’ केली.
तुकोबारायांनी या वैयक्तिक साधनेला थोडेसे व्यापक रूप दिले. पुढे नारायण बाबा हैबतबाबा आफळकर यांनी तुकोबाराय व ज्ञानोबा माऊलीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यास समूह भावनेचे अधिष्ठान दिले. तरीदेखील माझ्या पिढीच्या लहानपणी वारीला निघालेल्या वारकर्याकडे आम्ही अगदी औत्सुक्याने पाहात असू.
सारा गाव वारकर्याला गावच्या वेशीपर्यंत निरोप द्यायला यायचा. कारण प्लेग, देवी, अति पावसाळा आणि वाटेतील प्रचंड गैरसोयीचा सामना या वारकर्यांना करावा लागत असे. नंतर बैलगाडी, एस. टी., खासगी वाहने मोठ्या प्रमाणात वाढू लागली आणि लोकल वारी हळूहळू ‘ग्लोबल’ होऊ लागली.
आमचा आजा वारीला निघायचा तेव्हा चार-पाच पोस्टकार्ड बरोबर घेऊन जायचा. चार-आठ दिवसांनी एक-एक कार्ड वाटचालीच्या गावातून आमच्या गावी पाठवायचा. कधी-कधी ती थेट आषाढीच्या तोंडावर मिळायची. कारण, ‘मोबाईल’चा एवढा सुळसुळाट नव्हता. नंतर मोबाईल आले; पण प्रारंभीच्या काळात ते अस्पृश्य वाटू लागले.
नंतर मात्र बरेचसे वारकरी ‘मोबाईल’वरून दररोज वाटचालीचा वृत्तांत गावी कळवू लागले. आज तर वारीमध्ये आय.टी. क्षेत्रातील उच्चशिक्षित कॉम्प्युटर, सोशल मीडियातील तज्ज्ञ, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. या द़ृष्टीने वारी ही विश्वयात्रा होऊ पाहात आहे. ज्ञानोबा माऊलीने म्हटल्याप्रमाणे
हे विश्वचि माझे घर ।
ऐसी जयाची मती स्थिर
किंबहुना चराचर ।
आपणचि जाहला ॥
अशा या वारीच्या विश्वरूपाचा अभ्यास जर्मनीचे डॉ. गुंथर सोन्यायमर, फादर डलहरी, इन्फेड हाऊज इ. परदेशी विद्वान व विदुषींनी वारीचा एक ‘सोशल मिरॅकल’ म्हणून उल्लेख केला आहे. माध्यमकर्मीच्या कृतिशील सहभागामुळे वारी आता केवळ धार्मिक सोहळा राहिली नाही, तर ‘ग्लोबल मिरॅकल’ झाली आहे. आज अनेक संत साहित्याच्या अभ्यासकांचे स्वतंत्र ‘यूट्यूब चॅनल’ वारीची महती गाव-खेड्यापासून ते जगाच्या वेशीपर्यंत पोहोचवत आहे.
ज्ञानोबा माऊली व तुकोबाराय संस्थाननेही परंपरेला नव्यतेची जोड देऊन वारी फेसबुक, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्यात पोहोचविण्यास मान्यता दिली आहे. फक्त गरज एकच आहे की माध्यमांच्या गदारोळात वारीचा मूळ गाभा व ज्ञानोबा-माऊली आणि तुकोबारायांची जीवनद़ृष्टी हरवता कामा नये. वारीच्या स्वत्वाला आणि सत्वाला अबाधित ठेवूनच वारी जगभर पोहोचली पाहिजे. नाही तर ज्ञानोबा-तुकोबांची शिकवण ही साची, परी आमुची मउकी कच्ची अशी अवस्था व्हायची.
- प्रा. शिवाजीराव भुकेले, (लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)