

ज्येष्ठाची चाहूल लागताच आपली शेती-भातीतील कामे आटोपून शेतकरी कष्टकरी आणि पंधरा-वीस दिवसांची रजा टाकून नोकरपेशे ज्येष्ठ वद्य सप्तमी-अष्टमीला ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेत.
यांना कुणी निमंत्रण पाठविलं नाही. पण संतांच्या पालख्या खांद्यावर घेऊन जीवनातील सत्वशिलता शोधण्यासाठी मंडळी लाखोंच्या संख्येने वारीत सहभागी झालीत. एव्हाना कालच्या 26 तारखेला आषाढाचा पहिला दिवस वाजत-गाजत आला. आषाढाच्या आगमनाबरोबर सार्या सृष्टीचे रूपच बदलले. तिच्या या रसरशीत रूपाचं वर्णन करताना आपली माय बहिणाई म्हणू लागली...
टाळ्या वाजवीती पानं
दंग देवाच्या भजनी ।
जसी करती करुणा
होऊ दे रे अबादानी ।
देव आजब गारुडी ।
देव आजब गारुडी ॥
आषाढाच्या या हिरव्यागार वनसंपदेचा आस्वाद घेण्यासाठी पाच-पंचवीस वर्षांपूर्वी पन्नाशी उलटलेले स्त्री-पुरुष सहभागी व्हायचे. गावातल्या एखाद्या वृद्धाला टवाळ पोरं उपहासानं म्हणाची ‘आज्जा! जावा आता पंढरीला.
पण पाठीमागच्या एक-दोन दशकापासून वारीचा चेहरा अगदी तरुण झालाय! शेकडो तरुण-तरुणी वारीच्या वाटेवर जमेल ती सेवा करीत आहेत; किंबहुना हे तरुण-तरुणी वारीची केवळ शोभा नाहीत तर वारीची ‘धग’ आणि ‘रग’ आहेत. हा! त्यांच्या डोक्यावर परीट घडीची पांढरीशुभ्र टोपी नाही. कडक इस्त्रीचा नेहरू शर्ट नाही.
रुबाबदार दोन टांगी धोतर त्यांनी परिधान केलेले नाही. त्यांना ठेक्यात आणि झोकात भजन करता येत नाही; तर डोईवर हॅट, अंगात टी शर्ट आणि जीन पँट, पाठीवर सॅक... कुणाच्या हातात कॅमेरा तर कुणाच्या हातात वही, पेन... कोण आरोग्य वारीत प्रबोधन करतोय तर कुठली तरी तरुणी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणातील वारीत सहभागी झालेल्या स्त्रियांच्या भक्तिभावाचा अभ्यास करतेय. वेश, भाषा, कर्म, धर्म या सार्या गोष्टीपेक्षा वर वर ‘टपोरी’ वाटणारी ही पोरं-पोरी इरावती कर्वेचा ‘बॉयफ्रेंड’ विठ्ठलाच्या महावारीचा भक्तिभावाने अभ्यास करतात.
डॉ. बंडातात्या कराडकरांनी म्हटल्याप्रमाणे, “वारीत तरुण- तरुणींचा सभाग वाढतोय ही गोष्ट आनंदाची आहे. फक्त ‘येथ वडील जें जें करीती तया नाम धर्मु ठेवीती’ या माऊलींच्या ओवीप्रमाणे ज्येष्ठ व निष्ठावंत वारकर्यांचे तरुणांनी अनुकरण करावे.” हे अनुकरण आजची तरुण पिढी निश्चित करेल. तारुण्याच्या बाबतीत कितीही गैरसमज असले तरी तो अनुकरणप्रिय आहे, एवढे मात्र निश्चित, असा तरणा भाग्यवंतच विठू माऊलीच्या रंगात रंगू शकतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात,
ढळों नये जरी लाभ घरीचिया घरी
तरणा भाग्यवंत नटे हरि कीर्तनात ॥
- प्रा. शिवाजीराव भुकेले (लेखक संत साहित्याचे अभ्यासक व महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते आहेत)